Join us

मुंबईतील ‘आॅनलाइन जॉब रॅकेट’चा पर्दाफाश; बंगळुरूपर्यंत धागेदोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 5:54 AM

मुंबई : परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांकडून लाखो रुपयांची लूट करणाऱ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी पर्दाफाश ...

मुंबई : परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांकडून लाखो रुपयांची लूट करणाऱ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी पर्दाफाश केला. अजय गुप्ता (२३), सॅद्रिक रॉबर्ट (२३), विघ्नेश सुरेश के सी (२२) आणि नेहा पंचरिया (२३) अशी अटक आरोपींची नावे असून ते सर्व बंगळुरूचे आहेत. ‘इंटरनॅशनल जॉब्स अ‍ॅण्ड फ्री रिक्रुटमेंट’ या नावाने ते आॅनलाइन रॅकेट चालवित होते. मुंबई क्राईम ब्रँच-११ने ही कारवाई केली.

लक्ष्मीकांत शितांबरम् (६१) हे काही वर्षांपूर्वी आखाती देशातून निवृत्त झाले. त्यानंतर पुन्हा परदेशात नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, त्यांनी फेसबुकवर जाहिरात पाहिली. त्यात कॅनडा, यू.एस.ए., यू.ए.ई. या देशांत कोणतेही शुल्क न आकारता भरघोस पगाराच्या नोकरीचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यानुसार शितांबरम् यांनी बायोडाटा आणि अन्य कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅप, ईमेलद्वारे पाठविली. त्यानंतर दोघांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना कॅनडाला नोकरीसाठी पाठवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर विदेशी सिम कार्ड वापरून त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. ग्रुपवर नोकरीला लावलेल्या लोकांचे फोटो, पासपोर्ट होते. त्याद्वारे शितांबरम् यांचा विश्वास संपादन करत प्रोसेस फीच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांत जवळपास १ लाख ५४ हजार रुपये त्यांना आॅनलाइन भरायला सांगितले. मात्र, पैेसे भरूनही नोकरी मिळाली नाही. विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. शितांबरम् यांनी पैसे परत मागितले तेव्हा त्यांना दमदाटी करण्यात आली. शितांबरम् यांनी या प्रकरणी कांदिवली पोलिसांत तक्रार दाखल केली.गोरेगावमध्ये सापडला पहिला आरोपीगुन्हे अन्वेषण शाखेचा कक्ष ११ यांनी या प्रकरणी तपास हाती घेतला. या टोळीतील पहिला संशयित गुप्ता हा गोरेगावमध्ये आल्याची माहिती कक्षाचे पोलीस निरीक्षक रईस शेख आणि सहायक पोलीस निरीक्षक शरद झिने यांना मिळाली. त्यांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. त्याचे साथीदार बंगळुरूमधून हे रॅकेट चालवित असल्याने त्याने सांगितले. त्यानुसार कक्षाचे प्रमुख चिमजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक बंगळुरूला रवाना झाले. तेथून त्यांनी एका महिलेसह अन्य दोघांना अटक केली. महाराष्ट्रासह पंजाब, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये त्यांनी नोकरीच्या निमित्ताने अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.