Join us

नेटवरील औषध सर्चिंगचे ‘वेड, सायन रुग्णालयात अनेक जण दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:26 PM

आपल्याला एखादा आजार जडलाय असे वाटत असेल आणि त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेण्यापूर्वीच तुम्ही इंटरनेटवर त्या आजारावरील उपचार शोधत असाल तर सावधान! कारण औषधोपचारांबाबत सर्चिंग करीत राहणे, हा एकप्रकारचा मानसिक आजारच आहे.

ठळक मुद्दे आपल्याला एखादा आजार जडलाय असे वाटत असेल आणि त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेण्यापूर्वीच तुम्ही इंटरनेटवर त्या आजारावरील उपचार शोधत असाल तर सावधान!कारण औषधोपचारांबाबत सर्चिंग करीत राहणे, हा एकप्रकारचा मानसिक आजारच आहे.

 - स्नेहा मोरे

मुंबई- आपल्याला एखादा आजार जडलाय असे वाटत असेल आणि त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेण्यापूर्वीच तुम्ही इंटरनेटवर त्या आजारावरील उपचार शोधत असाल तर सावधान! कारण औषधोपचारांबाबत सर्चिंग करीत राहणे, हा एकप्रकारचा मानसिक आजारच आहे. असे अनेक रुग्ण सध्या सायन रुग्णालयातील मानसोपचार विभागात उपचार घेत आहेत.

सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलेला २८ वर्षीय ऋतिक (नाव बदललेले) ‘अँक्शिअस डिसॉर्डर’ने ग्रस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला आपण आजारी आहोत, असे वाटू लागले होते. त्यासाठी वेगवेगळ्या आजारांविषयी तो इंटरनेटवर माहिती सर्च करू लागला. मिळालेल्या माहितीच्या आधारे तो हृदयविकार तज्ज्ञ, मेंदूविकार तज्ज्ञ, मधुमेह तज्ज्ञ अशा सर्व डॉक्टरांकडे तो गेला. पण त्याला यापैकी कुठलाच रोग झाला नव्हता. तरीही तो असे का वागत आहे, त्याला नेमका कोणता आजार आहे, याचे निदान डॉक्टरांना करता आले नाही. अखेर दीड महिन्यानंतर या तरुणाला ‘सर्चिंग’ची मानसिक आजार जडल्याचे निदान डॉक्टरांनी केले आणि मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर, सायन रुग्णालयातील मानसोपचार विभागात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

प्रत्यक्षात हा मानसिक आजार आहे, असे सायन रुग्णालयातील डॉ. सागर कारिया यांनी सांगितले. या तरुणावर समुपदेशन थेरपी आणि औषधोपचार सुरू असल्याची माहितीही डॉ. कारिया यांनी ‘लोकमत’ला दिली. अशाच प्रकारे अवघ्या २० वर्षांच्या कौशल्य (नाव बदललेले) या तरुणालाही अशाच प्रकारच्या सर्चिंगने ‘पछाडले’ आहे. या तरुणाच्या हृदयावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यातून तो पूर्णपणे बरा देखील झाला.

मात्र, पुढे कधीतरी पुन्हा आपले हृदय खराब झाले तर, ही भीती त्याच्या मनात घर करून बसली आणि त्यामुळे तो हृदयासंबंधी आजारांबाबत व त्यावरील उपचारांबाबत इंटरनेटवर सातत्याने सर्च करू लागला. इतकेच नाही, तर त्या माहितीची प्रिंट काढून वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्याशी सल्लामसत करू लागला. त्यालाही ‘औषध सर्चिंग’चा मानसिक आजार जडल्याचे निदर्शनास आल्यानंतर गेल्या ३-४ आठवड्यांपासून सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अशा रुग्णांना पूर्ण बरे होण्यासाठी कमीतकमी सहा महिन्यांचा कालावधी लागतो, असे डॉ. कारिया यांनी सांगितले.

रात्रंदिवस चिंतेत असणे, कायम आजारांविषयी इंटरनेटवर उपचार शोधणे, हा मानसिक आजार असून, सध्या असे अनेक रुग्ण आमच्याकडे उपचार घेत आहेत. दोन महिन्यांतून अशा प्रकारचे किमान ३-४ रुग्ण उपचारांसाठी दाखल होतात. माहितीचा स्रोत म्हणून इंटरनेट उपयुक्त आहे. परंतु त्याचा अतिरेक टाळा. आपल्या घरातील एखादी व्यक्ती अशा प्रकारे वागत असेल तर तिच्यावर वेळीच लक्ष द्या. - डॉ. सागर कारिया, मानसोपचारतज्ज्ञ, सायन रुग्णालय