मुंबई : मराठी शाळा संस्था चालकांच्या अडचणी समजून त्यावर उपाय करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने मराठी शाळा संस्थाचालक संघ या कार्यगटाची स्थापना केली आहे. या कार्यगटातर्फे मुंबई व पालघर जिल्ह्यातील मराठी शाळांच्या संस्थाचालकांची दुसरी बैठक ७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडणार आहे.
‘मराठी शाळांचे प्रश्न व संस्थाचालकांची भूमिका’ हा या बैठकीचा मुख्य विषय असून, संस्था चालकांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आर्थिक, प्रशासकीय व शैक्षणिक प्रश्नांवर तसेच इतर अडचणींवर बैठकीत विचारमंथन करण्यात येणार आहे. ही दुसरी बैठक असून, यानंतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्याही बैठका पार पडणार आहेत. मराठी अभ्यास केंद्र संलग्न, मराठी शाळा संस्थाचालक संघाच्या माध्यमातून मराठी शाळांच्या संस्थाचालकांना या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी https://marathiabhyaskendra.org.in/schools या दुव्यावर जाऊन नाव नोंदवावे, असे आवाहन मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी केले आहे.