घरांच्या खरेदी-विक्रीस ‘ऑनलाइन’चा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:55 AM2020-08-01T00:55:00+5:302020-08-01T00:55:17+5:30
नरेडकोचे पोर्टल : प्रोत्साहन देण्याचा हेतू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरांच्या खरेदी-विक्रीला लागलेले ग्रहण कोरोना संकटामुळे आणखी गडद झाले आहे. घर खरेदी करण्यासाठी प्रकल्पांना भेट देणाऱ्यांची संख्यासुद्धा लक्षणीयरीत्या घटली आहे. त्यामुळे इच्छुकांना घर खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलने (नरेडको) 'ऌङ्म४२्रल्लॅऋङ्म१अ’’.ूङ्मे' हे वाणिज्य पोर्टल सुरू केले आहे. शुक्रवारी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.
४ नोव्हेंबर २०१९ रोजी लखनऊ येथे पार पडलेल्या पहिल्या नॅशनल रेरा कॉन्क्लेव्हमध्ये ही संकल्पना मांडण्यात आली होती. परंतु कोरोना दाखल झाल्यानंतर या व्यवसायाचा डोलारा कोसळला. सद्यपरिस्थितीत या व्यवसायासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म अनिवार्य झाले आहे. त्यामुळे या पोर्टलला अधिक व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. ताबा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेल्या प्रकल्पांना या पोर्टलमध्ये सहभागी होता येईल. देशातील असंख्य गृहप्रकल्पांची सविस्तर माहिती त्यावर असेल. केवळ घरांची खरेदी-विक्रीच नाही, तर राज्य सरकार, रेरा प्राधिकरण, विकासक, बँका तसेच गृहवित्त संस्थासुद्धा त्यावर असतील. त्यामुळे घर खरेदीदारांसाठी एक पारदर्शक आणि विश्वासार्ह वातावरण तयार होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला़
जगाच्या पाठीवर कुठेही असलेले लोक प्रकल्पांतील घरांची सखोल माहिती आॅनलाइन पद्धतीने मिळवून घरांचे बुकिंग करू शकतात. ग्राहकांना फ्लोअर प्लॅन, खोलीच्या दिशा, घरांच्या व्हिडीओ टूर्स आणि खिडकी/ बाल्कनीमधून बाहेरील दृश्य यांच्यासह संपूर्ण नोंदणी, माहिती पाहता येईल. त्यामुळे ठिकठिकाणच्या प्रकल्पांना भेट देण्याचे कष्ट कमी होतील. तसेच, जर बुकिंग केलेले घर प्रत्यक्ष पाहणीदरम्यान पसंत पडले नाही, तर पूर्ण रकमेचा परतावा ग्राहकांना केला जाणार आहे़