सिंधुदुर्गातही आॅनलाइन पेपर तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 02:49 AM2018-01-15T02:49:47+5:302018-01-15T02:50:19+5:30
मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे पेपर आॅनलाइन पद्धतीने तपासले होते, त्यात अनेक अडचणी आल्या, पण आता विद्यापीठाने तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा केल्या आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे पेपर आॅनलाइन पद्धतीने तपासले होते, त्यात अनेक अडचणी आल्या, पण आता विद्यापीठाने तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा केल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या मुंबई विभागात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी झाली होती. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयालक्ष्मी दळवी आदर्श महाविद्यालयातील संगणक लॅबचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे आता येथेही उत्तरपत्रिकांची आॅनलाइन तपासणी करण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे अलीकडेच कोकण दौºयावर गेले होते. त्या वेळी त्यांनी या संगणक लॅबचे उद्घाटन केले. २ दिवसांच्या दौºयात ११ महाविद्यालयांना भेटी दिल्या. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील महाविद्यालयांना भेटी दिल्या.
डॉ. शिंदे यांनी रायगड जिल्ह्यातील पाली येथील जे. एन. पालीवाल महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षाच्या वर्गात जाऊन रसायनशास्त्राचे लेक्चरच घेतले़
दापोली येथील दापोली अर्बन बँक विज्ञान महाविद्यालय, खेड येथील आयसीएस महाविद्यालय व लव्हेल येथील घरडा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालय, रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय व फिनोलेक्स अकॅडमी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालय व वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, या महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, आपण ग्रामीण भागात राहतो, असा न्यूनगंड न बाळगता विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून, तंत्रस्नेही होऊन ग्लोबल नागरिक बनावे. डिजिटल जगात करिअरच्या हजारो संधी उपलब्ध आहेत.