मुंबई - मुंबईत या वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आॅनलाइन पद्धतीने मंडपाची परवानगी मिळणार आहे. मंडपाचा आकार, रस्ते आदींबाबत उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषानुसार या परवानगी देण्यात येणार आहेत. मात्र, ही परवानगी गणेशोत्सवाच्या किमान एक महिना आधी मिळावी, अशी मागणी मंडळांनी लावून धरली आहे.मंडप उभारण्याच्या परवानगीसाठी १५ जुलैपासून सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर, वाहतूक व स्थानिक पोलिसांची ना हरकत मिळताच मंडळांना ही परवानगी देण्यात येणार आहे. यासंंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानगी लवकरात लवकर मिळतील, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे. या प्रक्रियेबाबत महापालिकेच्या विभाग स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे लवकरच विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेद्वारे देण्यात येणाºया परवानग्यांच्या कायदेविषयक बाबींचेही प्रशिक्षण सत्र विधि खात्याद्वारे आयोजित करण्यात येणार आहे.१५ आॅगस्टपूर्वी रस्ते खड्डेमुक्त करामुंबईतील अनेक मोठी मंडळे महिन्याभरापूर्वीच गणेशमूर्तींची स्थापना मंडपात करतात. त्यामुळे १५ आॅगस्टपूर्वी गणेशमूर्तींच्या आगमनाचा मार्ग खड्डेमुक्त करण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी, महापालिका प्रशासनाकडे केली असल्याचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र दहिबावकर यांनी सांगितले.
गणेशोत्सव मंडळांना मिळणार ‘आॅनलाइन’ परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 4:38 AM