बापरे! ऑनलाईन पिझ्झा मागवणं महिलेला पडलं चांगलंच महागात; तब्बल 11 लाखांचा घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 02:43 PM2022-01-16T14:43:48+5:302022-01-16T14:46:03+5:30
Crime News : एका वृद्ध महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई - अन्नपदार्थ ऑनलाईन मागवण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र अशा पद्धतीने पिझ्झा मागवणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. मुंबईतील अंधेरीत एका वृद्ध महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. तिला तब्बल 11 लाखांचा गंडा घातला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या सायबर गुन्हेगारांनी महिलेच्या खात्यातून जवळपास 11 लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. सायबर गुन्हेगारांनी महिलेची बँक खाती आणि इतर माहिती जाणून घेतली होती आणि त्यानंतर गंडा घातला आहे.
महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान (IT) कायदा आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 420 (फसवणूक) आणि इतर संबंधित तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेने पिझ्झा आणि ड्रायफ्रुट्स ऑनलाईन ऑर्डर करताना चुकून जास्त पैसे दिले होते आणि तिला ते पैसे परत हवे होते. यासाठी त्यांनी गुगलवर त्यासंबंधी प्रोसेस सर्च केली. अंधेरी भागातील रहिवासी असलेल्या या महिलेने पैसे परत मिळवण्यासाठी इंटरनेटवर शोध घेतला असता तिला एक फोन नंबर सापडला.
हॅकर्सने महिलेला 'असं' अडकवलं जाळ्यात अन्...
महिलेने या क्रमांकावर कॉल केला असता तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील, पण ते अॅपद्वारेच मिळेल, असे उत्तर देण्यात आले. महिलेला एक विशेष अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आलं. या अॅपच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांना महिलेचा फोन, बँकेची माहिती आणि पासवर्ड आदी माहिती मिळाल्याचं पोलीस अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. त्यानंतर 14 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2021 दरम्यान गुन्हेगारांनी महिलेच्या बँक खात्यातून 11.78 लाख रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले.
खात्यात 11.78 लाख रुपये केले ट्रान्सफर
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिने गेल्या वर्षी जुलैमध्ये ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला होता. यावेळी पिझ्झाचे पैसे देताना फोनमधून चुकून त्यांच्याकडून 9999 रुपये गेले. तसेच 29 ऑक्टोबर रोजी ड्रायफ्रुट्स खरेदी करताना ऑनलाईन माध्यमातून 1496 रुपये गेले होते. ती रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. अॅप डाऊनलोड केल्यानंतरही पैसे परत आले नाहीत तेव्हा तिला संशय आला आणि तिनं बँक खाते तपासले. यादरम्यान त्यांच्या खात्यातून अन्य कोणत्याही खात्यात 11.78 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे आढळून आलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.