मुंबई : वेबसाइटवर जाहिरात देऊन पश्चिम उपनगरात बोरीवली येथे राजरोसपणे वेश्याव्यवसाय चालविणारे सेक्स रॅकेट गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-१२ च्या पथकाने उघडकीस आणले. या प्रकरणी पिता-पुत्राला अटक करण्यात आली असून दोन तरुणींची सुटका केली आहे. नेमधारी घामन साहू (वय ५५, रा. पालनपाडा, पालघर) व त्याचा मुलगा संतोष साहू (२८, रा. पेनकरपाडा, मीरा रोड) अशी त्यांची नावे असून ते दलालीचे काम करतात. त्यांच्यावर यापूर्वी ठाणे, पालघरमध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले की, वेबसाइटवर आकर्षक तरुणीचे फोटो लोड करून त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाइल नंबर देण्यात आला होता, त्यानुसार कक्ष-१२ चे प्रभारी निरीक्षक सागर शिवलकर, निरीक्षक सचिन गवस यांनी सापळा रचला. तोतया गिºहाईक बनवून संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ज्या ठिकाणी तरुणी हवी आहे, त्या पत्त्यावर पाठविली जाईल. एका मुलीसाठी ५ हजार रुपये द्यावे लागतील. त्यापैकी १ हजार रुपये अनामत स्वरूपात ‘पेटीएम’ खात्यावर जमा करा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार मोबाइलधारकाने सांगितलेल्या खात्यावर एक हजार रुपये भरल्यानंतर त्याला बोरीवलीतील कुलूपवाडी येथील रहेजा इस्टेट या ठिकाणी तरुणींना घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांच्या नियोजनानुसार ठरलेल्या ठिकाणी साहू मुली घेऊन आल्यानंतर त्यांना अटक केली. साहू पिता-पुत्र हे गिºहाइकाकडून आगाऊ स्वरूपात आॅनलाइन पैसे भरून घेत असत. त्यानंतर गरजू तरुणी, महिलांना त्यांच्याकडे पाठवून देत. दोघांना अटक करून वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.