‘आॅनलाइन सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश
By Admin | Published: June 10, 2017 01:20 AM2017-06-10T01:20:37+5:302017-06-10T01:20:37+5:30
अंधेरीत ‘आॅनलाइन सेक्स रॅकेट’ चालविणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात गुरुवारी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला
मुंबई : अंधेरीत ‘आॅनलाइन सेक्स रॅकेट’ चालविणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात गुरुवारी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला यश मिळाले. या प्रकरणी दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून, दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे.
‘मुंबई एस्कॉर्ट सर्व्हिसेस’ नावाच्या एका साइटवरून हा वेश्याव्यवसाय सुरू होता. तेथील नंबर समाजसेवा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांना मिळाला होता. त्यानुसार त्यांनी या नंबरवर एका बोगस ग्राहकाला फोन करायला लावला. पलीकडील व्यक्तीने बोगस ग्राहकाला काही मुलींचे फोटो ‘व्हॉट्सअप’ केले आणि त्यातील काही ठरावीक मुली या स्पॉटवर येतील असे कबूल केले. त्याचवेळी एका हॉटेलमध्ये रूम बुक करा, असेही सांगितले. त्यानुसार अंधेरीच्या जिंजर हॉटेलमध्ये एक रूम बुक करण्यात आली. मुख्य म्हणजे रूम खरंच बुक केलेय का? याची खात्री या टोळीच्या लोकांनी करून घेतली. सर्व ठीकठाक असल्याची खात्री पटल्यावर या टोळीच्या लोकांनी गुरुवारी रात्री बोगस ग्राहकाला जिंजर हॉटेलकडे भेटायला बोलावले. त्यानुसार पोलिसांनी या हॉटेलच्या परिसरात सापळा लावून सिकंदरकुमार गुलाब यादव (२९) आणि बजरंगकुमार रामलाल यादव (२८) यांना ताब्यात घेत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
दोघे मूळचे झारखंडचे राहणारे आहेत. यातील सिकंदरकडून एक मोटारसायकल तर बजरंगकडून स्विफ्ट डिझायर कार हस्तगत करण्यात आली आहे. या कारमध्ये असलेल्या वीस आणि पंचवीस वर्षांच्या मुलींना सुधारगृहात पाठविण्यात आले.