मुंबई: ऑनलाइनखरेदीचा कल सध्या वाढत आहे. अशाच बनावट संकेतस्थळावरून देशभरात २२ हजार जणांची फसवणूक करणाऱ्या ठगाला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.शॉप्पीस डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून महिलांचे ड्रेस मेटेरियल, इमिटेशन ज्वेलरी, गृहोपयोगी इत्यादी वस्तूंच्या विक्रीची जाहिरात फेसबुकवरुन देण्यात आली. याच जाहिरातीला बळी पड़ून २२ हजार महिलांसह अन्य ग्राहकांची ७० लाख रूपयांना फसवणूक झाली आहे. मुंबईतल्या तक्रारदाराची या संकेतस्थळावरुन फसवणूक होताच त्याने सायबर पोलिसांकड़े धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी २१ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार सायबर पोलिसांनी अधिक तपास करत आरोपीला सुरत येथून बेड्या ठोकल्या. हा आरोपी संगणक तज्ज्ञ असून, त्याने परदेशात शिक्षण घेतले आहे. आरोपीच्या चौकशीतून आणखीन ११ संकेतस्थळांची माहिती मिळाली. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करताना ‘कॅश ऑन डिलिव्हरी’वर भर देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
ऑनलाइन खरेदी; २२ हजार जणांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 3:45 AM