मुंबई : कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने अनेकांनी ऑनलाइन शॉपिंगवर भर दिला. मात्र, अनेकदा फसवणुकीच्या तक्रारी येतात, ऑनलाइन शॉपिंग करताना जागरूक राहणे आवश्यक आहे, असे मत ग्राहक पंचायतीच्या मार्गदर्शन केंद्रांच्या समन्वयक शर्मिला रानडे यांनी व्यक्त केले.
याबाबत रानडे म्हणाल्या की, ऑनलाइन शॉपिंग फायदेशीर आहे, पण त्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन काळात घरात बसून खरेदी करता आली. वृद्ध व्यक्ती किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या व्यक्तीला घरात बसून हवे ते ऑर्डर करता येते. बाहेर जाणे, रांगेत उभे हे टाळता येते, तसेच खरेदी करताना वस्तूची तुलना करणे सोपे होते, तसेच वस्तूची खरेदी करणाऱ्याचे अभिप्राय असतात, त्यामुळे निर्णय करणे सोपे होते.
तर जर काळजी न घेता ऑनलाइन शॉपिंग केली, तर ती महागात पडू शकते. ऑनलाइन शॉपिंगमध्ये आपण स्वतः जाऊन वस्तूची निवड करू शकत नाही. त्यामुळे रंग किंवा वस्तूचा आकार, दर्जा पाहता येत नाही. अटी कित्येक वेळा बारकाईने वाचल्या जात नाही, रिफन्ड, वॉरंटी हे पाहिले नाही, तर नुकसान होऊ शकते, तसेच काही असुरक्षित संकेतस्थळ आहेत, त्यावरून खरेदी केली पाहिजे, अन्यथा आर्थिक भुर्दंड बसू शकतो, असेही त्या म्हणाल्या.
ग्राहकांनी हे नियम पाहावे.
संकेतस्थळ योग्य असावे.
वस्तुबाबत संकेतस्थळावर सर्व माहिती असावी.
देशाबाहेरील कंपन्यांचा नोडल अधिकारी भारतीय असावा.
संबंधित कंपनीत वस्तूंची तक्रार केल्यावर ४८ तासांत उत्तर मिळाले पाहिजे.
तक्रार एक महिन्यात निकाली निघावी.