आॅनलाइन तिकीट आरक्षण रोज रात्री बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 08:00 AM2018-08-27T08:00:12+5:302018-08-27T08:01:13+5:30
एसटी महामंडळाचे स्पष्टीकरण; तांत्रिक सक्षमीकरणाचे कारण
मुंबई : प्रवाशांची तिकिट खिडकीवरील आरक्षणाच्या रांगेची सुटका व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने २४ तास आॅनलाईन तिकिट आरक्षण सुरु केले होते. तांत्रिक कारणास्तव आॅनलाईन तिकिट सर्व्हर बंद असल्याचे वास्तव सर्वप्रथम ‘लोकमत आॅनलाईनने’ शुक्रवारी उजेडात आणले. या बातमीची दखल घेत एसटी महामंडळाने शनिवारी रात्री उशीरा ‘तांत्रिक सक्षमीकरणासाठी रोज रात्री यंत्रणा बंद करण्यात येते’, असे स्पष्टीकरण दिले आहे.
‘आता एसटी महामंडळातही तांत्रिक बिघाड’ असे वृत्त शनिवारी प्रसिद्ध होताच महामंडळातील यंत्रणा कामाला लागली. आॅनलाईन तिकिट सर्व्हर संबंधित अधिकाऱ्यांना या बाबत विचारणा करण्यात आली. यानंतर एसटी महामंडळाने शनिवारी रात्री उशीरा स्पष्टीकरण दिले. महामंडळाच्या स्पष्टीकरणानुसार, परिवहन महामंडळाच्या आगाऊ संगणकिय आरक्षण सुविधेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आलेला नसून केवळ तांत्रिक सक्षमीकरणाठी रोज मध्यरात्री ११.३० ते १२.३० या कालावधीमध्ये संगणकीकृत आरक्षण व्यवस्थेचे संस्करण करण्यात येते. त्यामुळे ही यंत्रणा या कालावधीत बंद करण्यात येते. या कालावधीमध्ये आगाऊ आरक्षण करणाºया प्रवाशांना अडथळा येतो. एरवी दिवसभरात कोणत्याही वेळी प्रवासी संगणकाद्वारे अथवा मोबाईलद्वारे कोणत्याही बसचे आरक्षण करू शकतात.
‘जाहीर सूचना प्रसिद्ध करा’
महामंडळाच्या स्पष्टीकरणानूसार एसटीचे आॅनलाईन तिकिट बुकिंग ही सेवा २४ तास सुरु नसल्याचे स्पष्ट होत आहे. संस्कारण होत असल्यामुळे आॅनलाईन तिकिट रात्रीच्या वेळी बंद करण्यात येईल, अशी जाहिर सूचना महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.