मुंबई : दादरच्या उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या ५७ वर्षीय बँक कर्मचारी महिलेला आॅनलाइन विमान तिकीट बुकिंग करणे महागात पडले आहे. त्यांची यामध्ये १ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी दोन दलालांविरुद्ध रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.दादर येथील उच्चभ्रू वसाहतीत ५७ वर्षीय तक्रारदार राहतात. त्या बँकेत नोकरीला आहेत. त्यांची मुलगी अमेरिकेला राहते. सप्टेंबर महिन्यात त्यांनी मुलीकडे जाण्याचे ठरविले. त्यानुसार, जस्ट डायलवरून त्यांनी विमान तिकीट बुकिंग संदर्भात दलालांबाबत चौकशी केली. त्याच दरम्यान त्यांना विविध दलालांचे फोन आले. त्यापैकी विकास नावाच्या व्यक्तीचा त्यांनी फोन घेतला, त्याने तो साई ट्रॅव्हल्समधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांनी विमानाची दिलेली आॅफर त्यांना आवडली. पुढे विकासने त्यांना याबाबत ५० टक्के रक्कम भरण्यास सांगितले. मात्र त्यांनी नकार दिला. विकासने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना मेलवर बनावट तिकीट पाठवून तिकीट बुक केल्याचे सांगितले. याबाबतचे पैसे अमित सिंग यांच्या बँक खात्यावर टाकण्यास सांगितले. त्यानुसार, तक्रारदार यांनी १० जुलै रोजी सिंगच्या खात्यात १ लाख ३० हजार रुपये जमा केले.रात्री त्यांनी आॅनलाइन तिकिटाबाबत तपासणी केली. मात्र त्यात काहीही माहिती न मिळाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी विकाससोबत संपर्क साधला. ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर अपडेट होत असल्याने दुसºया दिवशी तिकीट कन्फर्म झाल्याचे दिसेल, असे सांगून त्याने फोन ठेवला. ११ जुलै रोजी त्यांनी संबंधित विमान सेवा कंपनीकडे विचारणा केली. तेव्हा तिकीट बुक केले नसल्याची माहिती समोर आली. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
आॅनलाइन तिकीट बुक करणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 2:34 AM