Join us

महापालिकेच्या भाडेतत्त्वावरील मालमत्तांचे आॅनलाइन हस्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 2:34 AM

१ जानेवारीपासून ‘इज आॅफ डुइंग बिझनेझ’ अंतर्गत भाडेतत्त्वावरील मालमत्तांच्या हस्तांतराची कार्यवाही आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.

मुंबई : महापालिकेच्या मालमत्ता खात्याच्या अखत्यारीतील ३ हजार ५०५ भाडेतत्त्वावरील इमारतींमध्ये ४६ हजार ५६३ भाडेकरू राहत असून, भाडेकरूंच्या भाडेतत्त्व हक्कांचे हस्तांतर करण्याची कार्यवाही ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत फाइल पद्धतीने या टेबलावरून त्या टेबलावर होत होती. परंतु आता यावर उपाय म्हणून १ जानेवारीपासून ‘इज आॅफ डुइंग बिझनेझ’ अंतर्गत भाडेतत्त्वावरील मालमत्तांच्या हस्तांतराची कार्यवाही आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही कार्यवाही ३३ दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून, महापालिकेच्या ४६ हजार भाडेकरूंना दिलासा मिळणार आहे.महापालिकेच्या भाडेतत्त्वावरील इमारतींमधील निवासी अथवा व्यावसायिक मालमत्तांच्या भाडे हक्कांचे हस्तांतर करण्याची प्रक्रिया प्रशासकीय विभाग स्तरावर केली जाते. यामध्ये निवासी घरांचे वारसाहक्काने हस्तांतर, व्यावसायिक गाळ्यांचे वारसाहक्काने हस्तांतर, वारसाहक्काव्यतिरिक्त इतर स्वरूपाचे हस्तांतर या बाबींचा समावेश होतो. गेल्या वर्षीपर्यंत ही कार्यवाही पारंपरिक पद्धतीने म्हणजे फाइल स्वरूपात होत होती. त्यास विलंब होत होता. संबंधित अर्जदारास त्याचा अर्ज नक्की कोणत्या स्तरावर आहे? त्यात काही त्रुटी असल्यास किंवा विलंब होत असल्यास त्याची कारणे काय आहेत, याची माहिती व्यवस्थित मिळत नव्हती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मालमत्ता खात्याचे साहाय्यक आयुक्त पराग मसुरकर यांनी सांगितले.अशी आहे प्रक्रियामहापालिकेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन सेवा या टॅबवर माऊस पॉइंटर नेल्यानंतर आॅनलाइन प्रक्रियांची सूची दिसते.या सूचीमध्ये सगळ्यात शेवटी इस्टेट डिपार्टमेंट हा पर्याय दिसतो.यावर पॉइंटर नेल्यावर अ‍ॅप्लाय आॅनलाइन फॉर बिल्डिंग टेन्सिसी ट्रान्सफर आणि चेक अ‍ॅप्लिकेशन स्टेटस हे दोन पर्याय दिसतात.यापैकी अ‍ॅप्लाय आॅनलाइन फॉर बिल्डिंग टेन्सिसी ट्रान्सफर या पयार्यावर माऊस क्लिक केल्यास आॅनलाइन अर्जाचे पान उघडते.केवळ एक पानाच्या या सहज सुलभ अर्जासोबत व क्षतिपूर्ती बंधपत्र (इनडेमिनिटी बाँड), मूळ भाडेकरूचे ना हरकतपत्र, वारसदारांचे ना हरकतपत्र, शपथपत्र (अंडरटेकिंग) इत्यादींच्या स्कॅन कॉपी प्रकरणपरत्वे जोडणे आवश्यक आहे.अशी होणार अर्जाची पडताळणीआॅनलाइन पद्धतीने प्राप्त अर्जाची पडताळणी प्रशासकीय विभागांच्या स्तरावर करण्यात येईल.कायदेशीर बाबींची तपासणी व पूर्तता झाल्यानंतर अर्जदारास करारनामा करण्यासासह आवश्यक शुल्क भरण्याकरिता विभाग कार्यालयात बोलाविल्याची माहिती मेल, एसएमएसद्वारे दिली जाईल.हस्तांतर शुल्क भरणा केल्यानंतर महापालिका व संबंधित अर्जदार यांच्यामध्ये करारनामा केला जाईल.पालिकेच्या भाडेतत्त्वावरील मालमत्तांच्या हस्तांतराचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह आॅनलाइन पद्धतीने प्राप्त झाल्यापासून कार्यवाही ३३ दिवसांमध्ये होईल.

टॅग्स :मुंबई