लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र पर्यटनाने कोकण पर्यटनाच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, २८ मेपर्यंत दर शुक्रवारी संध्याकाळी ४.३० वाजता होणारी ‘नव्याने कोकण दाखवू या’ ही ऑनलाइन वेबिनार शृंखला आयोजित करण्यात आली आहे.
कोकण पर्यटन प्रादेशिक कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या या वेबिनार शृंखलेत कोकण पर्यटनाची बलस्थाने, कोकण पर्यटनाचे वैविध्य तसेच काही विशेष पर्यटन प्रकार यासंबंधी तज्ज्ञ आपले विचार मांडतील. ही वेबिनार्स कोकण टुरिझम प्रादेशिक कार्यालय, पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर उपलब्ध असतील. ३० एप्रिल रोजी सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेचे संस्थापक व वेळास येथील कासव संवर्धनाचे जनक भाऊ काटदरे कासव पर्यटन याविषयावर वेबिनार असेल.
७ मे रोजी रत्नागिरी पर्यटन विकासात २० वर्षांहून अधिक अनुभव असलेले हर्षा हॉलिडेजचे संस्थापक सुहास ठाकूर देसाई यांचे पुण्यभूमी पर्यटन रत्नागिरी या विषयावर वेबिनार असेल. १४ मे या दिवशी आडवळणावरचे कोकण या संस्थेचे संस्थापक आणि कोकणातील कातळशिल्पांचे संशोधक सुधीर रिसबूड यांचे कातळ शिल्प या विषयावर वेबिनार असेल. २१ मे रोजी वारसा फाउंडेशन या सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक संजय नाईक यांचे रेवदंडा पोर्तुगीज किल्ला पर्यटन या विषयावर वेबिनार असेल, तर २८ मे या दिवशी सावे फार्मचे मालक आणि कृषी पर्यटनातील आघाडीचे नाव असलेले प्रभाकर सावे यांचे पालघर पर्यटन या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आले आहे.
.....................