कीर्ती महाविद्यालयात स्पर्धा परीक्षाविषयी ऑनलाईन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:07 AM2021-03-08T04:07:09+5:302021-03-08T04:07:09+5:30
मुंबई : केंद्र आणि राज्य शासनाच्या सेवेत जाण्यासाठी असलेल्या विविध स्पर्धा परीक्षांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी कीर्ती महाविद्यालयाने पाच ...
मुंबई : केंद्र आणि राज्य शासनाच्या सेवेत जाण्यासाठी असलेल्या विविध स्पर्धा परीक्षांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी कीर्ती महाविद्यालयाने पाच दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. विविध स्पर्धा परीक्षांमधून यश प्राप्त करुन सध्या अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींद्वारे या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ९ ते १३ मार्च या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने ही कार्यशाळा होणार आहे. स्पर्धा परीक्षांच्याच बरोबरीने लॉ व मॅनेजमेंटच्या प्रवेश परीक्षांबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेला प्रवेश मोफत असून त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी कीर्ती महाविद्यालयाची वेबसाईट (www.kirticollege.edu.in) पहावी, असे कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ९ मार्च रोजी केंद्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचे सत्र असून वाणिज्य मंत्रालयातील अधिकारी सुप्रिया देवस्थळी या मार्गदर्शन करणार आहेत. तर, १० तारखेला एमपीएससी परीक्षेबाबत सुहास पाटील; ११ मार्चला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या विविध स्पर्धा परीक्षांबद्दल आनंद साळवे मार्गदर्शन करणार आहेत. तर, १२ मार्चला बँकिंग क्षेत्रांशी संबंधित विविध स्पर्धा परीक्षांबाबत संजय मोरे आणि १३ मार्चला मॅनेजमेंट व लॉ अभ्यासक्रमांसाठी असलेल्या प्रवेश परीक्षांबाबत डॉ. श्रीराम नेर्लेकर व ॲडव्होकेट सुधन्वा बेडेकर मार्गदर्शन करणार आहेत.