दूरसंचार विभाग, मुंबई एलएसएतर्फे ऑनलाइन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:07 AM2021-03-26T04:07:49+5:302021-03-26T04:07:49+5:30
मुंबई : दूरसंचार विभाग आणि एलएसए मुंबई यांच्या वतीने बुधवारी २४ मार्च रोजी मोबाइल टॉवर रेडिएशन विषयी जनजागृती करण्यासाठी ...
मुंबई : दूरसंचार विभाग आणि एलएसए मुंबई यांच्या वतीने बुधवारी २४ मार्च रोजी मोबाइल टॉवर रेडिएशन विषयी जनजागृती करण्यासाठी एका ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाइन कार्यशाळेत मोबाइल टॉवर रेडिएशनचे मानवी शरीरावर होणारे परिणाम याविषयी सर्वसामान्यांमध्ये असणारी चुकीची माहिती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सेल्युलर ऑपरेटरस असोसिएशन ऑफ इंडिया, टॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर असोसिएशन, रेसिडेन्शियल वेल्फेअर असोसिएशन, को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी चे सदस्य उपस्थित होते. शिवकामी राजगोपालन यांनी उपस्थितांचे स्वागत करीत मुंबई एलएसएचे वरिष्ठ उपमहानिर्देशक निजामउल हक यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी हेमंत बोराले यांनी सादरीकरणाद्वारे उपस्थितांमध्ये जनजागृती केली.
चांगली रेंज मिळावी यासाठी आपल्या आजूबाजूला मोबाइल टॉवर्स असतात. मात्र या टॉवरमधून होणारा किरणोत्सर्ग आपल्या शरीरावर कोणताही विपरीत परिणाम करत नाही. नागरिकांमध्ये याविषयी भीती असते मात्र ही भीती निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. दूरसंचार विभाग मोबाइल टॉवर्स वरील रेडिएशनवर नेहमी देखरेख ठेवते. तसेच आपल्या आजूबाजूला बसविण्यात येणाऱ्या टॉवर मधून होणाऱ्या किरणोत्सर्गाची चाचणीदेखील घेण्यात येते. यावेळी न्युरोसर्जन डॉ. विवेक टंडन यांनीदेखील मोबाइलमधून उत्सर्जित होणाऱ्या किरणांमुळे आपल्या शरीरावर कोणतेही नुकसान होत नसल्याचे सांगितले. यानंतर सी. पी. सामंत यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या शेवटी महेंद्र जैन यांनी उपस्थितांचे आभार मानले.