श्रावणात ऑनलाइन पूजा, पुरोहित झाले हायटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 04:01 AM2020-07-26T04:01:28+5:302020-07-26T04:01:35+5:30
कोरोनाचा असाही परिणाम; बुकिंगलाही चांगला प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मार्च महिन्यापासून सर्व क्षेत्रांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे बऱ्याच क्षेत्रांतील लोकांचे काम थांबले. पुरोहित सुमदायालाही याचा फटका सहन करावा लागला. श्रावण महिना हा सण उत्सवाचा म्हणून ओळखला जातो.
हा महिनाही असाच जाऊ नये, असा विचार करून पुरोहित वर्गाने आॅनलाइन पद्धतीने पूजेची तयारी दर्शविली असून याचे जोरदार बुकिंगही सुरू झाले आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणे व्हिडीओ-आॅडिओच्या माध्यमातून आता हायटेक पूजा सांगण्यात येणार आहे. श्रावणमास ते दिवाळीचे लक्ष्मीपूजन म्हणजे हिंदुधर्मातील प्रत्येक कुटुंबात सण, व्रतवैकल्ये, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक कर्म प्रत्येकाच्या घरी होत असतात. यात श्रावणातील सत्यनारायण, मंगळागौर, लघुरुद्राभिषेक, महारुद्र तर त्यानंतर भाद्रपदातील गणेशमूर्ती स्थापना, श्रीगणेश सहस्रावर्तन, ज्येष्ठा-कनिष्ठा गौरीपूजन, अनंत व्रताची उपासना व त्यानंतर लगेचच येणारा पितृपक्ष पंधरवडा.
त्यात होणारे पितृपक्ष त्यानंतर घटस्थापना, नवरात्रीची दुर्गा उपासना, सप्तशतीचे पाठ, नवचंडी याग, महाअष्टमी होम, कुंकुमार्चन, दिवाळीतील लक्ष्मीपूजन असे अनेक प्रतिवार्षिक यजमानांच्या घरी होणारे कर्म प्रत्येक यजमानांचे पुरोहित हे यजमानांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन यजमानांकडून करवून घेत असतात.
मात्र यंदा कोरोनामुळे यजमानांकडे गुरुजींना प्रत्यक्ष जाण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यावर या पुरोहित वर्गाने आॅनलाइनचा मार्ग शोधला आहे.
याविषयी, पुरोहित कल्याणी पैठणकर यांनी सांगितले, गुगल मीटद्वारे सर्व कर्मांसाठी जेवढे पुरोहित गुरुजी आवश्यक असतात, त्या सर्व गुरुजींना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अॅड करून यजमानांचे कर्म आॅनलाइन करून देण्याच्या मार्गदर्शनाचा उपक्रम सुरू झालेला आहे.
काळाच्या गरजेनुसार यजमानांची यातून सोय होईल. सर्वच यजमानांनी आपापल्या गुरुजींशी संपर्क करून याचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे, पुरोहिताचे आॅनलाइन पूजेसाठी प्रशिक्षण देण्यास सुरू करावे, असा मानस आहे, लवकर या उपक्रमाचाही श्रीगणेशा करÞण्यात येईल.
संसर्ग टाळण्यासाठी व्यवस्था
कोरोनाच्या संकटात संसर्ग टाळण्यासाठी, संपर्कविरहित राहण्यासाठी हा पर्याय योजण्यात आला आहे. या माध्यमातून केवळ गावा-शहरातच नव्हे तर परदेशातही पूजा करण्याची संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पुरोहित वर्गाने हा पर्याय स्वीकारून तंत्रज्ञानाचा आधार घेतला पाहिजे, अशी माहिती पुरोहित प्रवीण पळसकर यांनी दिली आहे. आता बºयाच ठिकाणी पूजेचे साहित्य संकेतस्थळांच्या माध्यमातून उपलब्ध आहे, त्यामुळे इथून आॅर्डर करता येते, तर पुरोहितांची दक्षिणाही विविध अॅप्सच्या माध्यमातून देण्याचा मार्ग उपलब्ध आहे.