केवळ ०.४ टक्के पदवीधर अभियंतेच रोजगारक्षम, सर्वेक्षणातून धक्कादायक बाब उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 06:31 AM2019-11-24T06:31:37+5:302019-11-24T06:32:17+5:30
अभियांत्रिकी हे क्षेत्र असे आहे ज्यातून शिकून बाहेर पडणारा पदवीधर विद्यार्थी हा अभियांत्रिकीशी निगडित क्षेत्र आणि सेवांची कौशल्ये, ज्ञान असणारा असायला हवा. मात्र...
- सीमा महांगडे
मुंबई : अभियांत्रिकी हे क्षेत्र असे आहे ज्यातून शिकून बाहेर पडणारा पदवीधर विद्यार्थी हा अभियांत्रिकीशी निगडित क्षेत्र आणि सेवांची कौशल्ये, ज्ञान असणारा असायला हवा. मात्र अभियांत्रिकी क्षेत्राच्या अभ्यासक्रमाचा विचार केल्यास हल्ली विद्यार्थी केवळ चार वर्षे घोकंपट्टी करून उत्तीर्ण होतात. त्यामुळे नोकरीसाठी अर्ज करताना अभियंत्यांसमोर सर्वात मोठे आव्हान आत्मविश्वासाचा अभाव हे असते, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच दरवर्षी पदवीधर अभियंत्यांपैकी केवळ ०.४% अभियंतेच रोजगारक्षम आहेत. यापैकी ३.६% उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये, तर २०% सेवा क्षेत्रात नोकरीस आहेत. याव्यतिरिक्त ३४% रोजगारक्षम योग्यता पातळीच्या कौशल्यांनी सक्षम नाहीत आणि ४२% रोजगारक्षम आहेत, परंतु त्यांना रोजगार नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
ब्रिजलॅब्ज सॉल्युशन्स एलएलपी या भारतातील आयपी-चलित इन्क्युबेशन लॅबने केलेल्या सर्वेक्षणात संपूर्ण भारतातील ११०० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग होता. या सर्वेक्षणात तंत्रज्ञानाच्या नोकरीसाठी अर्ज करताना अभियंत्यांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या समस्यांवरील तांत्रिक कौशल्याचे अंतर आणि कौशल्याच्या दृष्टिकोनातून माहिती घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर अभियंत्यांमधील आत्मविश्वासाच्या कमतरतेचे प्राथमिक कारण व्यावहारिक अनुभवाचा अभाव असल्याचे अभियंत्यांनी नमूद केले.
सर्वेक्षणातील विद्यार्थ्यांनी उत्तरे देताना ७२% अभियंत्यांनी या क्षेत्राची प्रचंड्र आवड असल्याने हे क्षेत्र निवडले, २१% जणांनी नोकरीची गरज असल्याने, तर ६% अभियंत्यांनी जास्त पगारासाठी हे क्षेत्र निवडल्याचे नमूद केले. मात्र प्रत्यक्ष नोकरीसाठी अर्ज करताना अभियंत्यांसमोर सर्वात मोठे आव्हान आत्मविश्वासाचा अभाव (५०%) हे होते. यातील ३०% जणांनी योग्यता चाचणी उत्तीर्ण केली नव्हती आणि २०% अभियंत्यांना या क्षेत्रातील कोडिंगच्या कामासाठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे समोर आले आहे.
पदवीधर अभियंत्यांमधील आत्मविश्वासाच्या अभावाचे एकमेव सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना अभ्यासक्रमादरम्यान प्रत्यक्ष अनुभव/प्रकल्पाभिमुख काम (४३%) करण्यासच मिळाले नाही, त्यामुळे त्यांना अनुभवच नसल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त २८% अभियंत्यांनी सांगितले की, प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाची कमतरता आहे. २१% विद्यार्थ्यांनी आपल्याला जो अनुभव किंवा तंत्रज्ञान अवगत आहे ते आता कालबाह्य असून जुन्या अभ्यासक्रमाचा हवाला दिला, तर ९% विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमात तंत्रज्ञानावर कमी लक्ष दिल्याचे कारण पुढे केले आहे.
‘कौशल्याची दरी कमी करणे हाच उद्देश’
देशातील अभियांत्रिकी प्रतिभेमधील वाढती कौशल्याची दरी कमी करणे हा सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश होता. भारतात अभियांत्रिकी शिक्षण व प्रशिक्षण ज्या पद्धतीने दिले जाते, त्यात आमूलाग्र बदल घडवणे हे या सर्वेक्षणाचे ध्येय आहे. अभियंत्यांना व्यावहारिक, वास्तविक, जगाच्या परिस्थितीत या शिक्षणाचा प्रभावी वापर करण्यास सक्षम बनविण्यामध्ये आम्ही मदत करू शकलो, तर आमच्या संस्थेचे योगदान उपयुक्त ठरू शकेल, अशी प्रतिक्रिया ब्रिजलॅब्जचे संस्थापक नारायण महादेवन यांनी दिली.