मुंबई : अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत ६९ हजार ६९१ विद्यार्थ्यांचा प्रवेश अलॉट झाला असून, त्यातील १५ हजार १२१ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये नामांकित महाविद्यालयांचा कट ऑफ केवळ ते १ ते २ टक्क्यांनी खाली घसरला आहे. त्यामुळे ८० टक्क्यांपर्यंत गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळण्यासाठी तिसऱ्या यादीचीच वाट पाहावी लागणार आहे.
दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी मुंबई विभागातून कोटा वगळता कॅप फेरीच्या एकूण १ लाख ६५ हजार जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी १ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. विद्यार्थ्यांनी १७ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चिती करणे अपेक्षित असल्याचे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.दुसऱ्या गुणवत्ता यादीत पाहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले कला शाखेचे १८६७, वाणिज्य शाखेचे ८०८८, विज्ञान शाखेचे ४९४१, तर एचएसव्हीसी शाखेचे २२५ विद्यार्थी आहेत.
दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय एकूण १३ हजार ५६६, तर तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय एकूण १०, २३९ विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहे. यामध्ये राज्य मंडळाचे एकूण ६४,१९२ विद्यार्थी आहेत. दुसऱ्या गुणवत्ता यादीत सीबीएसई २०६६, आयसीएसई २५६४, आयजीसीएसईच्या २९२, तर एनआयओएस मंडळाच्या ८५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावे
विद्यार्थ्यांनी कोणत्याही कोट्यातून (इन-हाउस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन व केंद्रीय प्रक्रियेतून) प्रवेश निश्चित केल्यास, प्रवेशित झालेले सर्व विद्यार्थी त्यापुढील तिसऱ्या फेरीसाठी (विशेष फेरीपर्यंत) प्रतिबंधित केले जातील. विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाल्यास विद्यार्थ्याला संबंधित महाविद्यालयात दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित करून घेणे बंधनकारक आहे. - संदीप संगवे, उपसंचालक, मुंबई विभाग