मुंबईतील १०० टक्के बस विजेवर धावणाऱ्या असतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:46 AM2018-03-17T06:46:04+5:302018-03-17T06:46:04+5:30
वांद्रे-कुर्ला संकुलात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते, त्यावर उपाय म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुढाकार घेत २५ हायब्रीड बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल केल्या.
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते, त्यावर उपाय म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुढाकार घेत २५ हायब्रीड बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल केल्या. आज ही संख्या २५ आहे. परंतु येत्या काळात ती हळूहळू वाढवत नेत मुंबईच्या रस्त्यांवरील १०० टक्के बस या विजेवर धावणाºया असतील, यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वाळकेश्वर येथील सह्याद्री अतिथीगृहात २५ हायब्रीड बसचे शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले, या वेळी ते बोलत होते.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, यू.पी.एस. मदान (आयुक्त, एमएमआरडीए), प्रवीण दराडे (सहायुक्त एमएमआरडीए), शंकर देशपांडे (जॉइंट प्रोजेक्ट डिरेक्टर टाउन प्लॅनिंग, एमएमआरडीए) आणि गिरीश वाघ (अध्यक्ष, कमर्शियल व्हेईकल्स आॅफ टाटा मोटर्स) यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला.
मुख्यमंत्री म्हणाले की, वांद्रे-कुर्ला संकुलात वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. ते कमी व्हावे आणि येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उच्च दर्जाची व्हावी, यासाठी शासनाकडून हायब्रीड बसचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. एमएमआरडीएमधील लोकांनी स्वत:च्या गाड्यांचा कमीत कमी वापर करत या बसलाच प्राधान्य द्यावे,
असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केले.
>‘बेस्ट’ला ८० बस
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते म्हणाले की, या बसची निर्मिती ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने मदत केली आहे. हायब्रीड बस घेण्यासाठी एमएमआरडीएने संमती दर्शविल्याने बस आज मुंबईत दाखल झाल्या आहेत. मार्चअखेरपर्यंत बेस्टला अशा ८० हायब्रीड बस देण्यात येतील.
>वाळकेश्वर येथील सह्याद्री अतिथीगृहात २५ हायब्रीड बसचे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, यू.पी.एस. मदान (आयुक्त, एमएमआरडीए), शंकर देशपांडे (जॉइंट प्रोजेक्ट डिरेक्टर टाउन प्लॅनिंग, एमएमआरडीए), गिरीश वाघ (अध्यक्ष, कमर्शियल व्हेईकल्स आॅफ टाटा मोटर्स) आदी मान्यवर उपस्थित होते.
>हायब्रीड बस तिकीट दर
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार हायब्रीड बसचे तिकीट दर हे १६ रूपये ते ११० रूपयांपर्यंत आहेत. हिरानंदानी ठाणे ते वांद्रे कुर्ला संकुल ११० रूपये, बोरीवली स्थानक ते वांद्रे कुर्ला संकुल ९४ रूपये, जलवायु विहार, खारघर ते वांद्रे कुर्ला संकुल ११० रूपये, एम.पी. चौक ते वांद्रे कुर्ला संकुल ६३ रूपये, राणी लक्ष्मीबाई चौक ते धारावी धारावी डेपो ४२ रूपये असे तिकिटांचे दर असतील.
>अशी आहे हायब्रीड बस...
संपूर्ण वातानुकूलित, बसमध्ये मोबाइल चार्जिंग पोर्ट, वायफायची सुविधा, एल.ई.डी. स्क्रीन, सीसीटीव्ही आणि जीपीएस सुविधा उपलब्ध.
दिव्यांगांसाठी बसमध्ये मोकळी जागा आणि बसमध्ये व्हीलचेअर नेण्यासाठी खास व्यवस्था.
गीअरलेस, क्लचलेस ३१ आसनांची क्षमता असलेली बस.
भारतातील पहिली हायब्रीड बस असल्याचा कंपनीचा दावा.
>येथे धावणार
या बस बोरीवली, ठाणे, मुलुंड, खारघर ते वांद्रे-कुर्ला संकुल मार्ग
सकाळी ७.३० ते ८.३० आणि सायंकाळी ६ ते ७ या वेळेत फेºया असतील.
वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात तसेच जवळच्या रेल्वे स्थानकांदरम्यान शटल सेवा उपलब्ध.
हायब्रीड तंत्रज्ञानामुळे कार्बन उत्सर्जनावर ३० टक्के बचत.
इतर बसच्या तुलनेत २८.२४ टक्के इंधनबचत.
बसमध्ये संपूर्ण इलेक्ट्रॉनिक किंवा फ्युएल सेलमध्ये परिवर्तन क्षमता.