वांद्रे टर्मिनसवर ‘त्या’वेळी केवळ १४ कर्मचारी?, रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 05:41 AM2024-10-29T05:41:29+5:302024-10-29T06:55:04+5:30
अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये क्षमतेपेक्षा २२ टक्के अधिक तिकीट विक्री झाली होती.
मुंबई : वांद्रे टर्मिनसवर रविवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीवेळी संपूर्ण टर्मिनसवर तिकीट तपासनीस दर्जाचे तीन कर्मचारी आणि आरपीएफचे केवळ ११ जवान कामावर हजर होते, अशी माहिती आता समोर येत आहे.
अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये क्षमतेपेक्षा २२ टक्के अधिक तिकीट विक्री झाली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त कुमक मागवणे अपेक्षित होते; पण त्याच कमी कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देणारे प्रशासन खरोखरच प्रवाशांच्या सुरक्षेबाबत काळजी घेत आहे का? असा सवाल आता रेल्वे प्रवाशांमध्ये उपस्थित होत आहे.
या घटनेनंतर पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रे टर्मिनसवर ३० ते ३५ विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित असतात. तेही घटनास्थळी उपस्थित होते. परंतु चेंगराचेंगरी झाली त्यावेळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये केवळ मोजकेच आरपीएफ जवान घटनास्थळी दिसत आहेत.
‘परे’, ‘मरे’वर अतिरिक्त फौजफाटा तैनात
वांद्रे टर्मिनसवरील दुर्घटनेनंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेने त्यांच्या टर्मिनसवर अतिरिक्त फौजफाटा तैनात केला असून, प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीदेखील बंद केली आहे. पश्चिम रेल्वेने अनारक्षित गाडीतील प्रवाशांसाठी होल्डिंग एरियाचीदेखील सुविधा केली आहे. तसेच गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रवाशांना रांगेमध्ये सोडण्यात येत आहे. रेल्वेने या उपाय योजना अगोदर केल्या असत्या तर चेंगराचेंगरीची घटना घडली नसती, असे मत आता प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान, दुर्घटना घडली त्यावेळी टर्मिनसवर ५० ते ६० कर्मचारी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. - अधिक वृत्त/२