मुंबई : पालिका शिक्षण विभागात दहा हजारांहून अधिक शिक्षक असताना त्यातील केवळ १४७ शिक्षकांनी महापौर पुरस्कारासाठी अर्ज केला आहे. मागील वर्षापेक्षा अर्जदार संख्येत वाढ झाल्याचा दावा पालिका शिक्षण विभागाकडून करण्यात येत असला तरी हे प्रमाण खूपच नगण्य असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात पालिका शिक्षण विभागात जवळपास ७०० हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांची संख्या ही कमी आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सोमवारी शिक्षण विभागाकडून ५० आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये २९ महिला शिक्षकांसह २१ पुरुष शिक्षकांचा समावेश असून, मराठी माध्यमाचे १६, इंग्रजी माध्यमाचे ११, तसेच हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या प्रत्येकी ७ शिक्षक-शिक्षकांचा समावेश आहे. ११ हजार रुपये, मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळने सन्मानित केले जाते अशी माहिती सहआयुक्त गंगाधरन डी. यांनी दिली.
पवित्र पोर्टलमधून भरतीप्रक्रिया
गेल्यावर्षी पालिकेतील प्राथमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या समायोजनासाठी कृती आरखडा जाहीर केला असून, पालिकेच्या ८ माध्यमांच्या शाळांमध्ये आणि मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मिळून जवळपास ८०० शिक्षक पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली. मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वाधिक म्हणजे २५९ पदे रिक्त असून, समायोजनाच्या कार्यक्रमात ही २० टक्के पदे कायम रिक्त ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला. लवकरच पवित्र प्रणालीमधून ही शिक्षक पदे भरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सीबीएसई शाळांची संख्या वाढविणार पालिकेच्या सीबीएसई शाळांना चांगला प्रतिसाद मिळत असून, यापुढेही प्रत्येक वॉर्डात सीबीएसई शाळा सुरू करण्याचा पालिकेच्या शिक्षण विभागाचा विचार कायम असल्याची माहिती गंगाधरन यांनी दिली.