Join us

"१५ टक्के दादा...फक्त १५ टक्के!", शिवसेनेला दिलेल्या निधीवरून फडणवीसांचा टोला; ऐकवली आठवले स्टाइल कविता!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 1:54 PM

राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत राज्याचे अर्थ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

मुंबई-

राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत राज्याचे अर्थ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी थेट आकडेवारी सादर करत महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या आमदारांना मिळणारा निधी आणि यावेळी शिवसेनेच्या आमदारांना मिळालेला निधी याची टक्केवारीच सादर करत अजित पवार यांना सडेतोड उत्तर दिलं. मविआ सरकारच्या काळात शिवसेना सर्वात मोठा पक्ष असूनही निधी मात्र १५ टक्के दिला गेला होता. यावेळी शिवसेनेच्या सदस्यांना ३४ टक्के निधी मिळाला हे फडणवीसांनी लक्षात आणून दिलं. 

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पात भाजपाला आमदारांना ६६ टक्के तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांना ३४ टक्के निधी दिला गेल्याचं विधान केलं होतं. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी मविआ सरकारच्या काळातील परिस्थितीची आठवण अजित पवारांना करुन दिली. 

"अजित दादा तुम्ही अगदी बरोबर आकडेवारी सांगितली. पण आता बाळासाहेबांच्या विचारांनी चालल्यानं काय परिणाम होतो हे मी तुम्हाला सांगतो. २०-२१ च्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रवादीला २ लाख ४८ हजार ३८८ कोटी, काँग्रेस १ लाख २१ हजार १४ कोटी आणि सगळ्यात मोठा पक्ष असलेला शिवसेना फक्त ६६ हजार कोटी रुपये. १५ टक्के दादा, १५ टक्के निधी दिला गेला. जेव्हा त्यांचे ५६ आमदार होते तेव्हा फक्त १५ टक्के, आता आमच्यासोबत ४० आमदार आहेत तरीही ३४ टक्के", असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

आठवले स्टाइल कवितेतून टोलादेवेंद्र फडणवीस यांनी यावेळी रामदास आठवले स्टाइल कविताही म्हटली. "आमच्या रामदास आठवले साहेबांच्या शब्दात सांगायचं तर.. तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून मारली आम्ही मुसंडी", असं फडणवीस म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअजित पवार