मुंबई : देशात सध्या ५० कोटी नोकरदार आहेत. त्यापैकी फक्त १५ टक्के नोकरदारच पेन्शन योजनेंतर्गत मासिक बचत करीत आहेत. ३० वर्षांनी देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या दुप्पट होणार आहे. त्यामुळे आता पेन्शन योजनेत बचत न करणाऱ्या ८५ टक्के नागरिकांना त्यावेळी काही समस्यांचा सामना करण्याची वेळ येऊ शकते, असे मत भविष्य निर्वाह निधी नियामक व विकास प्राधिकरणाचे (पीएफआरडीए) अध्यक्ष हेमंत कॉन्ट्रॅक्टर यांनी व्यक्त केले.भारतीय उद्योग महासंघातर्फे (सीआयआय) नुकतीच विमा व पेन्शन परिषद भरवण्यात आली. त्यावेळी कॉन्ट्रॅक्टर यांनी या विषयावर मत मांडले. ते म्हणाले, सध्या देशात १३ कोटी ज्येष्ठ नागरिक (६० वर्षावरील) आहेत. २०५० पर्यंत त्यांची संख्या ३० कोटी होईल. केंद्र सरकार इंदिरा गांधी पेन्शन योजनेनुसार २.५० कोटी ज्येष्ठ नागरिकांना मासिक २०० रुपये पेन्शन देते. पण ३० कोटींना अशी पेन्शन त्यावळी देणे हे सरकारसाठी अशक्य असेल. त्यामुळे नोकरी करणाºया तरुणांनी आतापासूनच पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरु करणे आवश्यक आहे. सध्या असंघटित क्षेत्रात फक्त दोन ते तीन टक्के कर्मचाºयांकडेच पेन्शनचे कवच आहे.सीआयआयच्या विमा व पेन्शन राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष संजीव बजाज, जॉयदीप रॉय, राजेश सूद यांच्यासह विमा क्षेत्रातील अधिकारी व उद्योजक यावेळी उपस्थित होते. विमा क्षेत्रात २० टक्के वाढीची गरजदेशातील विमा क्षेत्र सध्या १३ टक्क्यांनी वाढत आहे. दरवर्षी १० ते १२ टक्के नवीन विमाधारक तयार होतात. पण देशाची लोकसंख्या व वित्तीय स्थिती पाहता हे क्षेत्र किमान १५ ते २० टक्क्यांनी वाढण्याची गरज आहे, असे मत भारतीय विमा नियामक प्राधिकरणाचे (इर्डा) अध्यक्ष डॉ. सुभाष खुंतिया यांनी यावेळी व्यक्त केले.
फक्त १५ टक्के नागरिकांकडे पेन्शनचे योजनेचे कवच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 4:24 AM