मुंबई : चक्रीवादळामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसाने त्यांनतर विश्रांती घेतली. त्यामुळे मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता केवळ १५.५४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आणखी दीड महिना पुरेल इतका हा जलसाठा आहे. परंतु, पावसाने अशीच दांडी मारल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईत महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक असते. गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची चिंता नव्हती गतवर्षीच्या तुलनेत सध्या तलावांमध्ये ८० हजार दशलक्ष लिटर अधिक जलसाठा आहे.
मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा या तलावांमध्ये सध्या एकूण दोन लाख २४ हजार ८९४ दशलक्ष लिटर जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात एक लाख ४४ हजार ७३० दशलक्ष लिटर साठा होता. २०१९ मध्ये या काळात पाणीप्रश्न पेटला होता. जुलै अखेरपर्यंत मुंबईकरांची तहान भागेल इतकाच साठा सध्या तलावांत आहे.