मुंबईची तहान भागविणाऱ्या तलावात १६ टक्केच पाणी! तूर्तास पाणी कपात नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 09:13 AM2023-05-22T09:13:31+5:302023-05-22T09:13:46+5:30
मुंबईकरांची तहान तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार व भातसा या तलावांद्वारे भागविली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असतानाच वाढत्या तापमानामुळे मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळीदेखील आटत चालली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये १६.८ टक्केच पाणी शिल्लक आहे. कमी पाणीसाठा शिल्लक असला तरी तूर्तास पाणी कपात न करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाणी कमी असले तरी पाण्याची टंचाई जाणवत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून तूर्तास तरी पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नाही.
- पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
मुंबईकरांची तहान तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार व भातसा या तलावांद्वारे भागविली जाते. उन्हाचा तडाखा पाहता मुंबईला दररोज पाणीपुरवठा करणाऱ्या या तलावातून उपसा व पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे.
या सात तलावांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. यातील तुळशी व विहार तलाव सोडले, तर इतर तलाव मुंबईपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहेत. त्यातून मोठ्या जल वाहिन्यांद्वारे मुंबईत पाणी आणले जाते.
२१ मे रोजी या तलावात १६.८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्यावर्षी याच दिवशी २१.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.