मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत आता एकूण १ लाख ६ हजार ९८१ दशलक्ष लीिटर एवढा पाणीसाठा असून, हा पाणीसाठा जेमतेम २७ दिवसांचा आहे. त्यात पुढील ७२ तासांत सक्रिय होणारा मान्सून पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात मात्र ७ जुलैनंतरच पुरेपूर पडणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलावर कायम आहे.
मुंबई महापालिकेच्या वतीने एकूण ७ तलावांतून ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अपर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून पाणीपुरवठा करण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका जलसाठा लागतो.
बुधवारीही मान्सूनचा पट्टा पुढे सरकलेला नाही. मान्सून २३ जूननंतर सक्रिय होणार असून, मान्सून २५ ते २७ जूनदरम्यान मुंबईत येईल. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून संपूर्ण कोकण पट्ट्यात बऱ्यापैकी सक्रिय राहील.
पाणीपुरवठा करणारे तलाव हे ठाणे जिल्ह्यांत असून, काही नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहेत. वेगरिज ऑफ द वेदर या हवामान विषय माहिती देणाऱ्या संस्थेच्या म्हणण्यानुसार, मान्सूनच्या आताच्या हालचालींवरून मान्सून जुनच्या शेवटच्या आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सून कोकणात सक्रिय आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रात म्हणजे नाशिक पट्ट्यात मात्र मान्सून ७ जुलैनंतर सक्रिय होईल. त्यामुळे तेव्हा पडणाऱ्या पावसानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाण्याची पातळी वाढणार आहे.