दहावी-बारावीच्या परीक्षांना केवळ ३-४ महिन्यांचा अवधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:07 AM2021-01-19T04:07:58+5:302021-01-19T04:07:58+5:30
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासच नाही मिळत संधी : ५० टक्के अभ्यासक्रम कपातीची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे यंदा ...
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासच नाही मिळत संधी : ५० टक्के अभ्यासक्रम कपातीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून, एप्रिल, मे महिन्यांत परीक्षा होण्याचे संकेत आहेत. मात्र अद्यापही मुंबई महापालिका क्षेत्रात शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झालेली नसल्याने विद्यार्थी पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत किमान नववी ते बारावीचे वर्ग तरी सुरू झाले आहेत, मात्र मुंबईत विद्यार्थ्यांना अद्यापही ऑनलाइन शिक्षणाचाच आधार आहे. त्यात परीक्षा अवघ्या तीन महिन्यांवर आल्या असल्याने या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.
दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: १० महिन्यांचा कालावधी दिला जात होता. यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. मात्र मुंबईत जानेवारी सुरू झाला तरी नियमित वर्ग सुरू झाले नाहीत. तसेच कमी कालावधीमध्ये शिकवलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समजण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आणखी २५ टक्के कपात करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. तीन महिन्यांमध्ये ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे व त्याची उजळणी घेणे शक्य नाही. तसेच कमी वेळात शिकवलेल्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना नीट आकलन होणे अशक्य आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होऊन ते परीक्षेत नापास होण्याची शक्यता अधिक आहे, असे शिक्षकांकडून सांगण्यात आले.
......
दहावीचा अभ्यासक्रम
यंदा कोरोनामुळे दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्याने कमी केला असला तरी गणित, विज्ञान हे विषय ऑनलाइन पद्धतीने समजून घेणे कठीणच आहे. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत शिक्षकांसह विद्यार्थ्यांना करावी लागते.
बारावीचा अभ्यासक्रम
बारावीच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती मोठी आहे, शिवाय प्रात्यक्षिकांचा सराव यंदाच्या वर्षात अजिबातच झालेला नसल्याने काही कन्सेप्ट क्लिअरच नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा दिल्या तर पुढील करिअर निवडण्यात चांगली दमछाक होईल, अशी काळजी पालकांनाही सतावत आहे.
.....
दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थी, पालक दोघेही मानसिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या तयार नाहीत. अभ्यासक्रम पूर्ण शिकवून न झाल्याने नापास होण्याची चिंता अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. परिणामी विद्यार्थी मानसिक तणावाखाली येण्याची शक्यता लक्षात घेऊन अभ्यासक्रम आणखी २५ टक्के कमी करून ५० टक्के करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.
प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना
.....
परीक्षेचा अर्ज भरला आहे, मात्र अद्याप अनेक कन्सेप्ट क्लिअर नाहीत त्यामुळे खूप भीती वाटत आहे. परीक्षेला नेमके काय विचारतील, पेपर पॅटर्न कसा असेल, यामुळे अभ्यासक्रम पूर्णच झाला नाही असे वाटत आहे. यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे परीक्षेत नक्की काय होणार याची चिंता आहे.
- भाग्यश्री नलावडे, दहावी, विद्यार्थिनी
....
यंदा सगळे अभ्यासक्रम ऑनलाइन घेत आहेत, त्यामुळे अनेक विषय जे प्रत्यक्षात समजावून घेतले जातात त्यांचा अभ्यास झालाच नाही असे वाटत आहे. प्रात्यक्षिकांचे गुण याविषयीही संभ्रम आहेच.
- अद्वैत ठाकूर, बारावी, विद्यार्थी