‘त्या’ परीक्षेत केवळ ५३ विद्यार्थी उत्तीर्ण; पुनर्मूल्यांकनाची उमेदवारांकडून मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 12:42 AM2019-10-12T00:42:10+5:302019-10-12T00:42:24+5:30
संचालनालयाद्वारे घेण्यात आलेली ही शेवटची परीक्षा असून, यापुढे याची सर्व सूत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सुपुर्द करण्यात येतील.
मुंबई : एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग तीनच्या परीक्षेत केवळ ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल. या निकालात गोंधळ झाला असून, विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत पुनर्मूल्यांकन करावे किंवा परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी केली आहे. या संदर्भात अधिदान व लेखा कार्यालय कर्मचारी संघटनेकडूनही लेखा व कोषागार संचालनालयाला निवेदन दिले आहे.
संचालनालयाद्वारे घेण्यात आलेली ही शेवटची परीक्षा असून, यापुढे याची सर्व सूत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सुपुर्द करण्यात येतील. त्यामुळे यापुढे एमपीएससीच्या इतर भरतीप्रमाणेच ही भरती होईल. या पार्श्वभूमीवर या शेवटच्या निकालात गोंधळ घातल्याचा उमेदवारांचा आरोप आहे.
महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग तीनची परीक्षा एप्रिल, २०१८ मध्ये घेण्यात आली आणि तिचा निकाल तब्बल दीड वर्षांनी म्हणजेच ९ आॅक्टोबर, २०१९ रोजी जाहीर करण्यात आला. यातही परीक्षेतील भाग १ साठी एकूण ९३६ उमेदवार बसले होते, त्यातील फक्त ५३ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, ८८३ उमेदवार हे भाग १ मधील पेपर क्रमांक २ या विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. पेपरच्या मूळ स्वरूपाप्रमाणे पेपर क्रमांक २ मध्ये ३० टक्के सैद्धांतिक, तर ७० टक्के व्यवहारिक प्रश्न असे स्वरूप असायला हवे. मात्र, या परीक्षेमध्ये नेमके उलटे स्वरूप असल्याने विद्यार्थ्यांना फटका बसल्याच्या प्रतिक्रिया उमेदवार देत आहेत.
परीक्षेच्या अशा प्रकारच्या स्वरूपामुळे उमेदवारांना कमी गुण मिळाले आहेत व त्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याची प्रतिक्रिया सानिया शेख या उमेदवाराने दिली आहे. या पार्श्वभूमीवर पेपर क्रमांक २ मध्ये अनुत्तीर्ण सर्व विद्यार्र्थ्यांच्या निकालाचे पूनर्मूल्यांकन त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून करण्यात यावे, जेणेकरून उत्तीर्ण सर्व उमेदवारांना न्याय मिळू शकेल, तसेच पडताळणीनंतरही अनुत्तीर्ण होणाऱ्यांना पुन्हा परीक्षेची संधी द्यावी, अशी मागणी अधिदान व लेखा कार्यालय कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप कडू यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.