मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याकडे कल कमी झालेला दिसत आहे. आतापर्यंत पहिल्या फेरीत ४० हजार ३८३ आणि दुसऱ्या फेरीत १७ हजार ३१० असे ५७ हजार ६९३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. दुसऱ्या फेरीत ३० टक्के प्रवेशच निश्चित होऊ शकले आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशाची दोन फेरीतील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील १ लाख ३५ हजार ८९४ जागांपैेकी पहिल्या फेरीत ९२ हजार १४० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली होती. शासकीय आयटीआयमधील ३१ हजार ३५१, तर खासगी आयटीआयमधील ९ हजार ३२ असे एकूण ४० हजार ३८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर दुसऱ्या फेरीत ५५ हजार ९७२ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट केले होते. त्यापैकी १७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
असे घेतले प्रवेशदुसऱ्या फेरीत खासगी आयटीआयमधून ७ हजार २८३ झाल्या होत्या, त्यापैकी २ हजार ७०१ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निश्चिती केली आहे. शासकीय आयटीआयमधून दुसऱ्या फेरीत ४८ हजार ६८९ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, त्यापैकी १४ हजार ६०९ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दुसऱ्या फेरीत एकूण १७ हजार ३१० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून प्रवेशाची टक्केवारी ३०.९३ इतकी आहे.