मुंबई : गणेशोत्सवाचा परिणाम खासगी कार्यालयांबरोबर सरकारी कार्यालयांतही दिसून येत आहे. मंत्रालयात मंत्री कार्यालये तर अक्षरश: ओस पडली आहेत. तर प्रशासकीय विभागातही अवघी ३० टक्के हजेरी असल्याने मंत्रालयात एरव्ही असणारी गर्दीही दिसेनाशी झाली आहे.
निवडणुका लागतील की काय, असे वातावरण असल्याने मागील महिनाभरापासून मंत्रालयातील गर्दी अचानक वाढली होती. मात्र गणेशोत्सवासाठी अधिकाऱ्यांबरोबरच ६० ते ७० टक्के कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या टाकल्याने त्याचा परिणाम कार्यालयांत दिसून येत आहेत. केवळ ३० टक्के उपस्थितीमुळे कार्यालयांतील कामे अनंत चतुर्दशीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहेत.
गणेशोत्सवाचे वातावरणमंत्रालयातही गणेशोत्सवाचे वातावरण आहे. काही विभागात कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या गणरायाच्या तसबिरीसमोर सजावट करण्यात आली आहे. तर काही विभागात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे. यामुळे गणेशोत्सवातील फुले, अगरबत्त्यांचा सुगंध या विभागातही असून, उपस्थित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामे सुरू असली तरी सणाचे वातावरणही इथे येणाऱ्यांना जाणवत आहे.
पासाच्या रांगाही थांबल्या...उत्सवाच्या काळात पास काउंटरवरील गर्दीही दिसेनाशी झाली आहे. एरवी पाससाठीच्या रांगा या थेट पार्किंग लॉटच्या पुढे जात होत्या. आता गर्दीच नसल्याने काही पासच्या काही खिडक्या बंद ठेवल्या आहेत. बंदोबस्तावरील पोलिसांचा ताणही काहीअंशी कमी झाला आहे. कोणता इशारा नाही की आंदोलन नाही, त्यांना दिलासा मिळाला आहे.