सुरेश लोखंडे, ठाणेजिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेसाठी १८ अर्ज तर पाच पंचायत समित्यांसाठी २० अर्ज असे ३९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, कल्याण, अंबरनाथ तालुक्यांतून एकही उमेदवारी अर्ज मिळालेला नाही़ यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता आहे़प्रस्तावित नगरपालिका, नगरपरिषदेच्या मागणीसाठी कल्याण व अंबरनाथ तालुक्यांतील बहुतांशी गावपाडे या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांमध्ये नगरपरिषद, नगरपालिका करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीची स्थापनाही केलेली आहे. त्याद्वारे एकविचार करून ग्रामस्थांनी जि. प., पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासाठी हालचाली सुरू आहेत. राज्य शासनाकडे दिलेल्या प्रस्तावात पिसवली, नांदिवलीतर्फे पंचानंद या ग्रामपंचायती नगरपालिकेसाठी प्रस्तावित करण्यात आल्याा आहेत. तर गोलवली, आजदे, भोपर, सागाव, सोनारपाडा, निळजे या सहा ग्रामपंचायती नगरपंचायतींसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. त्यास आगामी सहा महिन्यांत मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शिष्टमंडळास दिल्याची चर्चा आहे.यामुळे सहा महिन्यांसाठी निवडणूक लढणे व जिंकणे उमेदवारांच्या आवाक्याबाहेर आहे. परिणामी, अर्ज दाखल करण्यास इच्छुकांमध्ये निरुत्साह आहे. तरीही उमेदवारी दाखल करण्यासाठी १३ जानेवारी हा एकच शेवटचा दिवस उरलेला आहे. एका दिवसात किती उमेदवार पुढे येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. पण, सध्या जि.प. ५५ जागांसह पाच पंचायत समित्या ११० जागांसाठी जिल्हाभरातून आतापर्यंत केवळ ३९ उमेदवारी अर्ज आले आहेत. यापैकी शहापूर तालुक्यात जि.प.साठी सहा तर पंचायत समित्यांसाठी पाच अर्ज आले आहेत. याशिवाय, मुरबाड तालुक्यातून जि.प.साठी चार तर पं. समितीसाठी आठ अर्ज आले आहेत. कल्याण तालुक्यात आतापर्यंत खडवली गटासाठी केवळ एक अर्ज आला आहे.
पाचव्या दिवसापर्यंत अवघे ३९ अर्ज
By admin | Published: January 13, 2015 12:43 AM