मुंबई : भारतातील केवळ ४१% मुले ही लॉकडाउनच्या काळात आॅनलाइन लर्निंगच्या माध्यमातून अभ्यास करीत आहेत. अनेक विद्यार्थी व पालक अशा शिक्षणापासून दूर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.ही सर्व मुले ५ ते १८ वयोगटातील आहेत. पूर्वेकडील राज्यात आॅनलाइन लर्निंगचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ६७% असून त्यानंतर ते पश्चिमेकडील राज्यात ४९% इतके आहे. दक्षिणेकडील राज्यात हे प्रमाण ३८%, तर उत्तरेकडील राज्यात ३५% इतकेच आहे. तब्ब्ल ७७% मुलांच्या शिक्षणावर लॉकडाउनचा परिणाम झाल्याचे सर्वेक्षणातून उघडकीस आले. सोबतच ६० टक्के पालकांच्या मतानुसार मुलांच्या सोशल अॅक्टिव्हिटीज आणि मैत्रीवर लॉकडाउनचा परिणाम झाला तर ५९ टक्के पालकांच्या मते मुलांच्या बाहेर खेळण्यावर व त्यामुळे त्यांच्या मनोरंजनावर यामुळे निर्बंध आले.मुलांवर लॉकडाउनचे काय आणि कसे परिणाम होत आहेत, हे जाणून घेण्यासाठी क्राय (चाइल्ड राइट्स अॅण्ड यू) संस्थेकडून आॅनलाइन रॅपिड सर्वेक्षण हाती घेण्यात आले. हे सर्वेक्षण देशभरात म्हणजेच पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण भागात करण्यात आले. याअंतर्गत पालकांकडून त्यांच्या मुलांविषयी सोप्या प्रश्नाद्वारे माहिती घेऊन निष्कर्ष काढण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे सर्वेक्षणातील ३७ टक्के पालकांच्या मते मुलांच्या मानसिकतेवर आणि वागणुकीवर लॉकडाउनचा विशेष परिणाम दिसून येत असल्याचे पूर्वेकडील राज्याने सर्वात जास्त म्हणजे ५१% टक्के प्रतिसाद देऊन मत व्यक्त केले आहे.एकीकडे मुलांचा इंटरनेट वापर वाढला आहे, तर दुसरीकडे फक्त ४३ टक्के पालक आपली मुले नेमके काय करत आहेत यावर लक्ष ठेवत असून, २२ टक्के पालक मुलांच्या इंटरनेटवरील सुरक्षिततेबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगतात.या सर्वेक्षणातील जमेची बाजू म्हणजे केवळ दहामधील एकाच पालकाने या कोरोनामुळे पदरी पडलेल्या या लॉकडाउनमध्ये आपल्या मुलासोबत वेळ घालवू शकत नसल्याची खंत व्यक्त केली. एकूण मतनोंदणी पैकी ५४% पालकांना त्यांची मुले घरातील कोणत्या ना कोणत्या कामात सहभागी होतात असे सांगितले, तर ५६% पालक मुलांसोबत बसून चित्रपट पाहण्याची मजा लुटत असल्याचे क्राय संस्थेच्या विशेष कार्यकारी अधिकारी पूजा मारवाह यांनी संगितले.५४% पालक सद्य:परिस्थितीवर आपल्या मुलांशी संवाद साधत आहेत, तर ४७% पालक असेही आहेत जे आपल्या मुलांना या सर्वांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली. व्हर्च्युअल शिक्षणाची व्याप्ती अजून वाढण्याची गरज असून ते एका योग्य मार्गाने मुळापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था व्हायला हवी. समाजाचा बराचसा मोठा वर्ग आजही यापासून दूर असल्याने शिक्षणाच्या अधिकाराखाली हे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ऑनलाइन र्लनिंगचा लाभ केवळ ४१% विद्यार्थ्यांना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 7:21 AM