मेट्रोच्या कारशेडसाठी फक्त ५०० झाडे तोडली?; एमएमआरसीएलने नेमकी माहिती देण्याचा आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:48 AM2019-11-01T01:48:24+5:302019-11-01T01:48:38+5:30

एमएमआरसीएलने सांगितल्याप्रमाणे मेट्रो ३ च्या कारशेडमधील बाधित सर्व झाडे तोडली असतील, तर झाडांवरील नंबर आणि व्हिडीओद्वारे निरीक्षणात तसे दिसायला हवे

Only 5 trees were cut down for the Metro's Carshed ;; MMRCL urges for accurate information | मेट्रोच्या कारशेडसाठी फक्त ५०० झाडे तोडली?; एमएमआरसीएलने नेमकी माहिती देण्याचा आग्रह

मेट्रोच्या कारशेडसाठी फक्त ५०० झाडे तोडली?; एमएमआरसीएलने नेमकी माहिती देण्याचा आग्रह

googlenewsNext

मुंबई : मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील दोन हजार १४१ झाडे तोडल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) केला असला, तरी एरियल शॉट, झाडांवरील नंबर आणि व्हिडीओ निरीक्षणाच्या आधारे पर्यावरणवाद्यांनी साधारणत: ५०० झाडे तोडण्यात आल्याचा नवा दावा केला आहे.

एमएमआरसीएलने दोन हजार १४१ झाडे तोडल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले असले, तरी ही माहिती वस्तुस्थितीला धरून नसल्याचे पर्यावरणवाद्यांच्या पाहणीत आढळून आले आहे. झाडे तोडल्याच्या जागेत कोणालाही प्रवेश नसल्याने वस्तुस्थिती समोर येत नाही. त्यामुळे एकतर तेथे प्रवेश द्यावा किंवा एमएमआरसीएलने नेमकी माहिती जाहीर करावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे. आरे कॉलनीतील मेट्रो ३ च्या कारशेडसाठी दोन हजार २३८ झाडांची कत्तल केली जाणार होती. मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरसीएलच्या बाजूने निर्णय दिल्यावर मेट्रो प्रशासनाने रातोरात दोन हजार १४१ झाडे तोडली. तसा तपशील न्यायालयात सादर केला. मात्र एरियल शॉट आणि व्हिडीओत तोडलेल्या झाडांची संख्या पाहिली तर ती जुळत नाही. साधारणत: ५०० झाडे तोडल्याचे त्यातून उघड होते. तसे असेल, तर आरेतील तोडल्या जाणाऱ्या झाडांपैकी ९० टक्के वृक्ष जिवंत असल्याचा दावा आंदोलकांनी केला.

आरे कन्झर्व्हेशन ग्रुपचे सदस्य रोहीत जोशी म्हणाले, एमएमआरसीएलने सांगितल्याप्रमाणे मेट्रो ३ च्या कारशेडमधील बाधित सर्व झाडे तोडली असतील, तर झाडांवरील नंबर आणि व्हिडीओद्वारे निरीक्षणात तसे दिसायला हवे. त्यामुळे झाडे जर जिवंत असतील, तर आंदोलन सुरूच राहिले पाहिजे. हा संदेश मुंबईकरांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आता झाडेच जिवंत राहिली नाहीत; तर मग कसले आंदोलन करणार, असा काहीसा समज नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. तो आता दूर होऊ शकेल, असे म्हणणे त्यांनी मांडले. आंदोलकांनी घेतलेले एरिएल शॉट, फोटो आणि व्हिडीओत कोणत्या भागातील झाडे कापण्यात आली आहेत, हे त्यावरून केलेले निरीक्षण व अभ्यासावरून जवळपास ५०० झाडे तोडल्याचा अंदाज त्यांनी काढला आहे. ज्या जागेतील झाडे तोडली गेली त्या जागेची संयुक्त तपासणी करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.

शिवसेना आता तरी आरेला न्याय देणार का?
आम्ही सत्तेत आल्यावर वृक्षतोडीसंदर्भात ठोस पावले उचलू, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. आता शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आले आहे. आदित्य ठाकरे यांनीही वृक्षतोडीबाबत भाष्य केले होते. त्यामुळे आता शिवसेनेने आरेबद्दल ठोस भूमिका घेतली पाहिजे, असा आग्रह आंदोलकांनी धरला आहे.

Web Title: Only 5 trees were cut down for the Metro's Carshed ;; MMRCL urges for accurate information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.