Join us

दीड लाखापैकी केली केवळ ५० हजार झाडांचीच छाटणी; ७ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 10:06 AM

पावसाळ्यापूर्वी धोकादायक स्थितीतील झाडांच्या तसेच अतिरिक्त वाढलेल्या फांद्यांच्या छाटणीचे काम सुरू आहे.

मुंबई : पावसाळ्यापूर्वी धोकादायक स्थितीतील झाडांच्या तसेच अतिरिक्त वाढलेल्या फांद्यांच्या छाटणीचे काम सुरू आहे. ७ जूनपूर्वी १ लाख ४८ हजार झाडांची छाटणी पूर्ण होणे अपेक्षित असून आतापर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त झाडांची छाटणी मुंबई महापालिकेने पूर्ण केली. यात वन विभागाची हद्द, डोंगर उतार तसेच रेल्वेच्या लगतच्या झाडांचाही समावेश आहे.

पालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ झाडे खासगी संस्थांच्या आवारात आहेत. १० लाख ६७ हजार ६४१ झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरात आहेत. एकूण झाडांपैकी १ लाख ८६ हजार २४६ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. त्यापैकी १ लाख ४८ हजार १६९ हजार झाडांची छाटणी अपेक्षित आहे. ७ जूनपर्यंत झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे. 

मृत आणि कीड लागलेली तसेच वाकलेली ४३३  झाडे सर्वेक्षणादरम्यान आढळली आहेत. यापैकी ३८६ झाडे काढून टाकली. डोंगर उतरावरील धोकादायक झाडांची छाटणी करण्यात येत आहे. उद्यान विभागाने सर्वेक्षणाअंती जवळपास ४० ठिकाणे निश्चित केली असून, ४१४ झाडांपैकी ३०५ झाडांची छाटणी झाली आहे. उद्यान विभागाच्या सर्वेक्षणानुसार पालिका क्षेत्रासह वन विभागाच्या हद्दीतील ४० ठिकाणी मिळून ४१४ धोकादायक झाडांपैकी ३०५ झाडांची छाटणी केली. उर्वरित झाडांची छाटणी ७ जूनपर्यंत पूर्ण होईल. महानगरात खासगी, शासकीय मालकीच्या परिसरामधील झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी ८ हजार ५५७ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली.

‘झाड कापायचे असेल तर वाॅर्ड ऑफिसला फाेन करा’-

महापालिका क्षेत्रातील रस्त्याच्याकडेची तसेच सार्वजनिक ठिकाणच्या झाडांची छाटणी उद्यान विभागाकडून केली जाते. गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले.

टॅग्स :मुंबईनगर पालिका