लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या तब्बल सव्वा कोटींच्या घरात आहे. आर्थिक राजधानीची बिरूदावली मिरविणाऱ्या या महानगरात विपन्नावस्थेतील लोकांची संख्याही कमी नाही. गोरगरिबांना किमान एक वेळचे जेवण तरी नीट मिळावे म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन केंद्रे सुरू केली; पण मुंबईत केवळ ५६ केंद्रांवर शिवभोजन थाळी दिली जात असून, दररोज सरासरी बारा हजार लोकांनाच त्याचा लाभ मिळतो.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी विभागात फक्त पाच शिवभोजन आहार केंद्रे आहेत. या केंद्रांवर दररोज सरासरी १०००-१२०० थाळ्यांचे वितरण होते. मात्र, या पाच केंद्रांपैकी जोगेश्वरी पश्चिमेतील केंद्राचा अपवाद वगळता उर्वरित चार केंद्रे शासकीय आस्थापनांच्या परिसरात आहेत. वांद्रे येथे जिल्हाधिकारी कार्यालय, विलेपार्ले येथील आर. एन. कुपर रुग्णालय, के. बी. भाभा रुग्णालय आणि सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयातील उपाहारगृहात शिवभोजन केंद्रे चालविली जातात. त्यामुळे रुग्णालय अथवा शासकीय आस्थापनांच्या परिघात नसलेल्या विपन्नावस्थेतील नागरिकांचे काय, असा प्रश्न अनुत्तरित आहे. तर, वडाळा विभागात एकूण १४ मंजूर शिवभोजन केंद्रांपैकी १३ कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांतून साधारणपणे रोज २९०० ते ३००० थाळ्यांचे वितरण केले जाते. याशिवाय, परळ विभागात १२ केंद्रे मंजूर असून, त्यापैकी ११ कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांवर दररोज सरासरी २००० ते २१०० थाळ्यांचे वितरण केले जाते. कांदिवली विभागात सर्वाधिक २९ केंद्रे असून, त्यापैकी २७ कार्यरत आहेत. येथील केंद्रांवर साधारणपणे रोज ५५०० ते ६००० थाळ्या वितरित केल्या जातात.
शिवभोजन थाळी योजनेतील विविध केंद्रांवर शंभरपासून चारशेपर्यंत थाळ्या वितरित होतात. कोविडच्या काळात राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने गरिबांसाठी मोठ्या प्रमाणावर भोजन व्यवस्था करण्यात आली. आता मात्र नियमित थाळ्यांच्या मर्यादित संख्येमुळे ठरावीक नागरिकांनाच याचा लाभ मिळतो. थाळ्यांची मर्यादा संपल्यावर मात्र ऎनवेळी आलेल्यांना माघारी फिरावे लागते.
जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्रे - ५६
रोज लाभार्थ्यांची संख्या - साधारण १२ हजार
अंधेरी विभागातील केंद्रे - ०५
रोज लाभार्थ्यांची संख्या - ११२१
वडाळा विभागातील केंद्रे - १३
रोज लाभार्थ्यांची संख्या - २९१५
परळ विभागातील केंद्रे - ११
रोज लाभार्थ्यांची संख्या - २१८२
कांदिवली विभागातील केंद्रे - २७
रोज लाभार्थ्यांची संख्या - ५६१७