मुंबई : महापालिकेचा महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प वादात सापडल्यामुळे गेल्या आठ महिन्यांत केवळ ६.२५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. तसेच ५९३ कोटी रुपये खर्च झाल्यामुळे चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत हुकण्याची शक्यता आहे.कोस्टल रोडच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या प्रकल्पाचे काम कोणत्या टप्प्यात आहे? याबाबतची माहिती स्थायी समिती सदस्यांनी मागविली होती. या अहवालानुसार कोस्टल रोडचे काम १६ जुलैपासून स्थगित करण्यात आले आहे. गेल्या सात महिन्यांत दोनवेळा न्यायालयीन प्रकरणात प्रकल्पाचे काम थांबविण्यात आल्यामुळे नियोजित १२.५६ टक्के काम होऊ शकले नाही.या प्रकल्पाचे काम आॅक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाले. मरिन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंतचे काम महापालिका करीत आहे. मात्र एप्रिल आणि जुलैमध्ये या प्रकल्पाला स्थगिती मिळाल्यामुळे काम थांबविण्यात आले. उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी महापालिकेने सर्वाेच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यात आली असून लवकरच यावर सुनावणी अपेक्षित आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाचे केवळ ६.२५ टक्के काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 6:12 AM