राज्यात केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांना मिळाले लसीचे दाेन्ही डाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:05 AM2021-05-29T04:05:59+5:302021-05-29T04:05:59+5:30
४५ हून अधिक वय असणारे २.५ कोटी नागरिक पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लस पुरवठ्यातील सततच्या ...
४५ हून अधिक वय असणारे २.५ कोटी नागरिक पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लस पुरवठ्यातील सततच्या अडथळ्यांमुळे राज्यात लसीकरण कासव गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांचे पूर्ण लसीकरण करण्यात आले, म्हणजेच या लाभार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले. आतापर्यंत केवळ ३४ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्या ४५ हून अधिक वय असणारे २.५ कोटी नागरिक लसीच्या पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्यात अजूनही आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या लसीचे डोस पूर्ण झालेले नाहीत. १.३८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजूनही कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही, तर २३ हजार कोव्हॅक्सिन लसीचे आरोग्य कर्मचारी लाभार्थीही दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्यात १७.८५ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यातील ९२ टक्के म्हणजेच १६.४९ लाख फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला; परंतु अजूनही ८९ हजार फ्रंटलाइन कर्मचारी दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी फ्रंटलाइन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा व स्थानिक पातळीवरील प्रशासनाला दिले आहेत.
लसीच्या दोन्ही डोसमधील अंतरही वाढल्यामुळे लसीकरण प्रक्रियेची गती मंदावल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले. याविषयी, राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, ६० हून अधिक वय असणाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण केले पाहिजे. त्यांनतर ४५ हून अधिक वय असणाऱ्या, अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे. कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर ७६ टक्के रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते. पुढील ३-४ महिन्यांत संवेदनशील गटातील ७० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे.
...तर संसर्गावर मात करणे सोपे
जुलैअखेरपर्यंत ६० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण केल्यास तिसऱ्या लाटेला रोखणे सोपे जाईल. त्याशिवाय सातत्याने अन्य पातळ्यांवर संसर्ग नियंत्रणाचे कामही सुरू ठेवले पाहिजे. ४५ हून अधिक वय असणाऱ्या ८० टक्के लोकांचे लसीकरण आणि १८ ते ४४ वयोगटातील ६० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. लसीकरणाला गती मिळाल्यास संसर्गावर मात करणे अधिक सोपे होईल.
- डॉ. सुभाष साळुंखे,
काेरोनाविषयक मुख्य सल्लागार, राज्य सरकार
..............................................................