२८०० वाहतूक पोलिसांसाठी फक्त ९५० रेनकोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 02:36 AM2019-06-14T02:36:26+5:302019-06-14T02:36:52+5:30
करावी लागणार प्रतीक्षा : पावसात भिजत करावे लागते काम
मुंबई : मुंबईत तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. भर पावसात वाहतुकीचे नियमन करण्याचे काम वाहतूक पोलीस करतात. मुंबईत एकूण २८०० पोलीस असून फक्त ९५० रेनकोट वाहतूक पोलिसांकडे आले आहेत. उर्वरित पोलिसांना रेनकोटची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेत सुमारे २८०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. पावसाळ्यात वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच पाण्यात अडकलेली वाहने काढणे, प्रवाशांना मदत करणे अशी अनेक कामे वाहतूक पोलिसांना करावी लागतात. छत्री घेऊन कर्तव्य बजावताना गैरसोय होत असल्याने दरवर्षी रेनकोट दिले जातात. मात्र जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी यंदा अद्याप रेनकोट मिळालेले नाहीत.
असे असताना गुरुवारी रेनकोटचा पहिला कोटा आला आहे. त्यामध्ये केवळ ९५० रेनकोट असून, उर्वरित १८५० पोलिसांना पावसात भिजत काम करावे लागणार आहे. मुंबईत सुरू असलेली विकासकामे आणि ठिकठिकाणी करण्यात आलेली पूलबंदी यामुळे यंदाही पावसात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कशा प्रकारे कर्तव्य बजावावे याबाबत वाहतूक पोलिसांना मान्सून कृती आराखड्यातून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु पावसाळ्यापूर्वी रेनकोट द्यायला हवे होते, ते अजूनही दिले नाहीत. पोलिसांप्रति प्रशासन गंभीर नाही, अशा शब्दांत काही पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे.
९५० रेनकोटचा पहिला टप्पा
अद्याप रेनकोट कोणाला देण्यात आलेले नाहीत. आज ९५० रेनकोटचा पहिला कोटा आला आहे. रेनकोटचे तातडीने वाटप करण्यात येत आहे.
- शहाजी उमाप,
उपायुक्त, वाहतूक विभाग
लवकरच वाटप
दरवर्षी सर्व पोलिसांना रेनकोट दिले जातात. ज्या पोलिसांकडे रेनकोट नाहीत त्या सर्वांना लवकरच रेनकोट देण्यात येतील.
- सूर्यकांत नोकुडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भायखळा वाहतूक विभाग