‘तिवरांचे जंगल वाचले तरच मुंबई वाचेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 03:02 AM2018-10-02T03:02:12+5:302018-10-02T03:02:30+5:30
न्यायालयाने मुंबईमधील तिवरांच्या जंगलाच्या कत्तलीबाबत चिंता व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले होते. जेथे तिवरांची कत्तल झाली आहे तेथे सरकारने पुन्हा तिवरांचे रोपण करावे.
मुंबई : दहिसर, बोरीवली, मीरा रोड येथे तिवरांची बेसुमार कत्तल होत असून, हे असेच सुरू राहिले तर एक दिवस मुंबई बुडण्याचा धोका आहे. परिणामी, मुंबईला वाचविण्यासाठी महाराष्ट्र मानव सेवा संघाचे अध्यक्ष हरिश शेट्टी यांनी ‘मॅनग्रोव्हज बचाव’ मोहीम सुरू केली. केंद्र सरकार, पर्यावरण विभाग, जिल्हाधिकारी, पोलिसांकडे त्यांनी पत्रव्यवहार करत धोक्याची कल्पना दिली. मात्र यावर कारवाई केली जात नव्हती. अखेर हरिश यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने मुंबईमधील तिवरांच्या जंगलाच्या कत्तलीबाबत चिंता व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले होते. जेथे तिवरांची कत्तल झाली आहे तेथे सरकारने पुन्हा तिवरांचे रोपण करावे. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या हद्दीतील तिवरांचे आरेखन करावे आणि पोलीस, वनरक्षक आणि सरकारच्या सुरक्षा महामंडळाचे रक्षक यांच्यावर निगराणीची जबाबदारी निश्चित करावी. संकेतस्थळ तयार करावे. सोशल मीडियामार्फत तक्रार दाखल करता येईल, अशी व्यवस्था करावी. टोल फ्री क्रमांक सुरू करावा, असे न्यायालयाने निर्देशात म्हटले होते.