अहवाल आल्यानंतरच तपासाला मिळणार दिशा, नातेवाइकांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 01:56 PM2023-10-08T13:56:44+5:302023-10-08T13:57:26+5:30
जय भवानी एसआरए इमारतीस आग लागल्याची माहिती त्वरित अग्निशमन दलाला देण्यात आली हाेती.
मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील जय भवानी एसआरए इमारतीस लागलेल्या भीषण आगीत ७ जणांचा मृत्यू झाला, याला अग्निशमन दल कारणीभूत आहे, असा आरोप नातेवाईकांकडून होत असला तरी अग्निशमन दलाच्या अहवालानंतर पोलिसांना तपासासाठी योग्य दिशा मिळणार आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सध्या अपमृत्यूची नोंद केली असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी ‘लोकमत’ला दिली.
जय भवानी एसआरए इमारतीस आग लागल्याची माहिती त्वरित अग्निशमन दलाला देण्यात आली हाेती. अग्निशमन दलाचे पथक अपघातस्थळी पोहोचेपर्यंत प्रसंगावधान राखत इमारतीमधील रहिवासी व लाेकांनी बचावकार्य सुरू केले. तासभरानंतर आलेल्या अग्निशमन दलाने पुढील बचावकार्य हाती घेतले हाेते.
तपासात सीसीटीव्ही महत्त्वाचे
- मृतांच्या नातेवाइकांचे, त्या ठिकाणी हजर असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे, अशी माहिती परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांनी दिली.
- अग्निशमन विभागाकडून घटनेचा अहवाल येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
- अहवालामध्ये कोणताही दखलपात्र गुन्हा आढळल्यास त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
- सदर ठिकाणी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजचीही मदत नेमके काय घडले ते पडताळण्यासाठी घेतली जाणार असल्याचेही
पोलिसांनी सांगितले.
- आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असून, त्यानुसारही तपास सुरू असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.