उपमुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स निवडणुकीनंतरच उघडू, वाचा मुख्यमंत्र्यांचं उत्तर 'जुगाडू'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 08:13 AM2019-02-21T08:13:35+5:302019-02-21T08:14:37+5:30

अडचणीच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांची फिल्मीस्टाईल बगल : स्मितहास्य करत उद्धव ठाकरे यांचीही टोलेबाजीला दाद

Only after the suspension of Deputy Chief Minister to be elected, after the election, the Chief Minister's reply 'Jugaadu' | उपमुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स निवडणुकीनंतरच उघडू, वाचा मुख्यमंत्र्यांचं उत्तर 'जुगाडू'

उपमुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स निवडणुकीनंतरच उघडू, वाचा मुख्यमंत्र्यांचं उत्तर 'जुगाडू'

Next

मुंबई : शिवसेनेसोबत युतीचा प्रश्न सुटला असला तरी सत्तावाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी विचारलेल्या प्रश्नावर ‘सर्व सिक्रेट लागलीच उघड करायची नसतात,’ असे सांगत या कळीच्या मुद्द्याला बगल दिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे हे समोर पहिल्या रांगेत बसले होते आणि त्यांनीही यावेळी स्मितहास्य करत या प्रश्नोत्तरांचा आनंद लुटला.

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर पुरस्कार वितरण सोहळ््यात अभिनेते रितेष देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली. भाजपा-शिवसेनेने ‘हम साथ साथ है’ म्हणत युती केली. पण दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते विचारत आहेत की, ‘हम आपके है कौन?’ अशा परिस्थितीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कुणाचा होणार, असा थेट प्रश्न देशमुख यांनी केला. त्यावर फडणवीस म्हणाले की, ‘सत्ता युतीची येणार हे नक्की. मात्र सर्व सस्पेन्स आताच उघड करता येणार नाही. योग्यवेळी ते लोकांना समजेल.’

सत्ता आल्यावर ‘सामना’तून बाण चालवले जात होते. मात्र आता तुमचे हसरे चेहरे लोकांना दिसत आहेत. ‘तुम इतना क्यूँ मुस्कुरा रहे हो? क्या गम है जिसको छुपा रहे हो?’ असा खोचक प्रश्न देशमुख यांनी करताच फडणवीस म्हणाले, की जे झाले ते झाले. आता नव्याने सुरुवात करायची आहे. देशात अनेक ठिकाणी असंगाशी संग सुरु आहे. मात्र भाजपा-सेनेचे धोरण हिंदुत्व हेच आहे. काही मुद्द्यांवर असलेले मतभेद आता दूर झाले आहेत. व्यापक हिताकरिता आम्ही पुुन्हा एकत्र आलो आहोत. म्हणूनच आमच्या चेहऱ्यावर हसू आहे.
युतीच्या नव्या जागावाटपावर कार्यकर्ते नाराज असल्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, की सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये हा निर्णय अपरिहार्य होता. सर्व विरोधक एकजुटीने आमच्या विरोधात लढत असताना राज्याच्या हितासाठी युतीचा निर्णय गरजेचा होता. त्यात प्रत्येकालाच दोन पावले पुढे-दोन पावले मागे जावे लागले. त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज झाले असले, तरी त्याला नाईलाज आहे.
राजकारणात अभिनयाचा गुण कितपत आवश्यक आहे, असे विचारताना देशमुख यांनी काम करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. प्रत्येक अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे आमिष दाखवण्याचे कसब आपण कसे दाखवता, असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला. त्यावर ते म्हणाले की, ही गुरुकिल्ली एका पत्रकाराकडून मिळाली. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख हेही प्रत्येक विधिमंडळ अधिवेशनापूर्वी आणि नंतर लवकरच विस्तार करु, असे सांगत होते. या आश्वासनावर त्यांनी बरीच वर्षे काढली. मी आजवर पाहिले आहे. राजकारणात कुणी आशा सोडत नाही. म्हणूनच मंत्रीमंडळ विस्ताराच्या आश्वासनावर माझीही साडेचार वर्षे सहज निघाली, असे त्यांनी सांगताच उपस्थितांत एकच हशा पिकला.

२०२९ पर्यंत पंतप्रधानपद आरक्षित
मराठी पंतप्रधान म्हणून तुम्हाला शरद पवार की नितीन गडकरी यांना पाहायला आवडेल, असा अडचणीचा प्रश्न देशमुख यांनी विचारल्यावर पंतप्रधानपद २०२९ पर्यंत आरक्षित असल्याचे सांगून नरेंद्र मोदी हेच भावी पंतप्रधान असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस खूप हळवे आहेत
फडणवीस यांचे लोकांना माहित नसलेले एखादे गुपित सांगण्याची विनंती देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना केली असता त्या म्हणाल्या की, देवेंद्र अत्यंत भावूक आहेत. त्यांच्यासोबत ‘थ्री इडियटस’ हा चित्रपट पाहत असताना एका भावनिक दृष्याच्या वेळी ते भावनावश झाल्याचे आपण पाहिले, असे त्या म्हणाल्या.

विदर्भाचा सर्वाधिक विकास
विदर्भ वेगळा झाला तर तुम्हाला विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल की, उर्वरित महाराष्ट्राचा, असे विचारले असता फडणवीस यांनी आपल्या राजवटीत विदर्भाचा सर्वाधिक विकास झाल्याचा दावा केला.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाकरिता अनेक निर्णय सरकारने घेतले. नागपूरकर असल्याचा अभिमान असला तरी सत्तेचा गाडा हाकताना संपूर्ण महाराष्ट्र डोळ््यासमोर ठेवला, असेही ते म्हणाले.

Web Title: Only after the suspension of Deputy Chief Minister to be elected, after the election, the Chief Minister's reply 'Jugaadu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.