एअर इंडियाच्या ५२विमान उड्डाणांमध्ये केवळ महिला वैमानिक आणि केबीन क्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 01:34 AM2020-03-09T01:34:35+5:302020-03-09T01:34:41+5:30
एअर इंडियासाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा आहे. आमच्या केबिन क्रू व वैमानिकांनी आपल्या कामगिरीने एव्हिएशन क्षेत्रात जागतिक पातळीवर आपल्या कार्याचा दबदबा निर्माण केला आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एअर इंडियाने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मार्गावर ५२ उड्डाणे केवळ महिला केबिन क्रू व वैमानिकांच्या माध्यमातून केली. यामध्ये ८ आंतरराष्ट्रीय व ४४ देशांतर्गत उड्डाणांचा समावेश होता. गेल्या काही वर्षांपासून महिला दिनानिमित्ताने एअर इंडिया हा उपक्रम राबवत आहे. या उड्डाणांमध्ये केबिन क्रू, सहवैमानिक व वैमानिकाची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर असते. दिल्ली ते सॅनफ्रॅन्सिस्को या थेट उड्डाणाचादेखील यामध्ये समावेश होता. वाईड व नॅरो बॉडी विमानांचा यामध्ये समावेश होता. महिला कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहेत व कितीही मोठी जबाबदारी स्वीकारण्यास कमी पडत नाहीत हे या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
एअर इंडियाचे प्रवक्ते म्हणाले, एअर इंडियासाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा आहे. आमच्या केबिन क्रू व वैमानिकांनी आपल्या कामगिरीने एव्हिएशन क्षेत्रात जागतिक पातळीवर आपल्या कार्याचा दबदबा निर्माण केला आहे. एअर इंडियामध्ये केबिन क्रू, वैमानिक, सहवैमानिक, तंत्रज्ञ, संचालक, अशा विविध पदांवर महिलांनी सक्षमपणे काम केले आहे व काम करत आहेत.