पर्यटन क्षेत्राला सावरण्यासाठी देशांतर्गत पर्यटक एकमेव आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:12 AM2021-08-17T04:12:03+5:302021-08-17T04:12:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे जगभरातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. बहुतांश देशांनी अद्यापही आपल्या सीमा पूर्णतः खुल्या ...

The only base for domestic tourists to revive the tourism sector | पर्यटन क्षेत्राला सावरण्यासाठी देशांतर्गत पर्यटक एकमेव आधार

पर्यटन क्षेत्राला सावरण्यासाठी देशांतर्गत पर्यटक एकमेव आधार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे जगभरातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. बहुतांश देशांनी अद्यापही आपल्या सीमा पूर्णतः खुल्या न केल्याने येत्या काही महिन्यांत हे क्षेत्र उभारी घेण्याची शक्यताही धूसर आहे. त्यामुळे या कठीण काळात तग धरून राहण्यासाठी देशांतर्गत पर्यटनवाढीवर भर देणे हा एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डिसेंबरनंतर कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी झाल्यामुळे पर्यटन व्यवसायाला आशेचा किरण दिसून आला होता. मात्र, दुसऱ्या लाटेने पुन्हा अडचणी निर्माण केल्या. एप्रिलमध्ये बंद झालेल्या आंतरराष्ट्रीय सीमा अद्यापही खुल्या झालेल्या नाहीत. दुसरीकडे डीजीसीएने आंतरराष्ट्रीय विमानांवरील निर्बंधही शिथिल न केल्याने त्यात आणखी भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनावर त्याचा परिणाम झाल्याने व्यावसायिक चिंतित आहेत.

यासंदर्भात इंटरमाइल्स या पर्यटन कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष ध्रुव यांनी सांगितले की, कोरोनाकाळात पर्यटनाचा ट्रेंड बदलला आहे. पर्यटक आता देशांतर्गत पर्यटनाला पसंती दर्शवू लागले आहेत. बहुतांश नागरिक घरापासून जवळ म्हणजे ३०० ते ३५० किलोमीटरच्या आत भ्रमंती करण्यास उत्सुक आहेत. गोवा, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरला भेट देणाऱ्यांची संख्या या काळातही नोंद घेण्याजोगी आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राला सावरण्यासाठी देशांतर्गत पर्यटक हा एकमेव आधार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्यटक आता चैनीपेक्षा सुरक्षेला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. स्वच्छता, निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्सिंग आणि तंत्रज्ञानाधारित सुरक्षा साधनांसह प्रवास करण्यास बरेच जण प्राधान्य देत आहेत. पर्यटनासाठी घराबाहेर पडणाऱ्यांत २५ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक असल्याचेही आशिष ध्रुव यांनी सांगितले.

..........

दरवर्षी दक्षिण आफ्रिकेत पर्यटनासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी असते. दीड वर्ष लॉकडाऊनमध्ये घालविल्यानंतर बरेच जण आता घराबाहेर पडून भ्रमंती करू इच्छित आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी आफ्रिकेसारख्या देशांनी व्हिसा प्रक्रिया सुलभ केली आहे. सध्या पाच ते सात दिवसांत दक्षिण आफ्रिकेचा व्हिसा मिळतो. त्यामुळे येत्या काळात पर्यटन क्षेत्राला चांगले दिवस येण्याची आशा आहे.

- नेलिस्वा नकानी, प्रमुख, साऊथ आफ्रिकन टुरिझम

Web Title: The only base for domestic tourists to revive the tourism sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.