...तरच मुंबईसारखी शहरे वाचविणे शक्य!; शहर अभ्यासक, पर्यावरणतज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 02:10 AM2019-11-01T02:10:38+5:302019-11-01T08:24:07+5:30

कार्बन उत्सर्जन कमी करत जीवनशैली बदलणे गरजेचे

... Only cities like Mumbai can be saved !; Opinions of city practitioners, environmentalists | ...तरच मुंबईसारखी शहरे वाचविणे शक्य!; शहर अभ्यासक, पर्यावरणतज्ज्ञांचे मत

...तरच मुंबईसारखी शहरे वाचविणे शक्य!; शहर अभ्यासक, पर्यावरणतज्ज्ञांचे मत

Next

सचिन लुंगसे

मुंबई : कार्बन उत्सर्जन कमी करत आपण आपली जीवनशैली बदलली आणि विकासाकडे वाटचाल करताना पर्यावरण दृष्टिकोन ठेवत धोरणे आखली तर नक्कीच समुद्रकाठी असलेल्या मुंबईसारख्या जगभरातील शहरांना आपण बुडण्यापासून वाचवू शकतो, असे मत शहर अभ्यासक, पर्यावरणतज्ज्ञ आणि पर्यावरणीय संस्थांनी मांडले.

उपग्रहांच्या मदतीने घेण्यात आलेल्या छायाचित्रानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनांती समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी धोकादायक बनत आहे़ वाढत्या पातळीमुळे २०५० पर्यंत म्हणजे ३१ वर्षांत अर्धी मुंबई पाण्याखाली जाईल, असा निष्कर्ष न्यू जर्सी येथील वैज्ञानिक संघटना असलेल्या ‘क्लायमेट सेंट्रल’च्या ‘नेचर कम्युनिकेशन’ या शोधनिबंधात काढण्यात आला आहे. केवळ मुंबई नाही, तर समुद्रकाठच्या बहुतांश शहरांना समुद्राच्या पाण्याच्या वाढत्या पातळीचा धोका आहे.

मुंबई शहराचे अभ्यासक सीताराम शेलार यांनी या पार्श्वभूमीवर सांगितले की, मुंबईसारख्या शहरात आपण खूप गुंतवणूक करीत आहोत; ती करण्याची गरज नाही. लोकांचा पैसा आपण मुंबईत ओतत आहोत. मेट्रो बनवित आहोत. कोस्टल रोड बनवित आहोत. भूमिगत मेट्रो बनवित आहोत. याची काही गरज नाही. मुंबईसारख्या शहराला घातक असलेले प्रकल्प थांबविले पाहिजेत. झाडे लावून प्रश्न सुटणार नाही. जगण्याचे मॉड्युल बदलले पाहिजे. पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, असा विकास झाला पाहिजे. त्वरित सगळे बदलेल असे होणार नाही; पण किमान सुरुवात तरी केली पाहिजे. नैसर्गिक साधन-संपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर करून ते संपविले तर प्रश्न आणखी बिकट होईल.

वातावरण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भगवान केशभट यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने धोरणे बदलली पाहिजेत. कार्बन उत्सर्जन कमी केले पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिले पाहिजे. विकास करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. झाडे लावली पाहिजेत. पर्यावरण जपले पाहिजे. मुळात आता पाहण्यास गेले तर आपणास खूप उशीर झाला आहे. तरीही किमान हे उपाय राबवित आपण समुद्रकाठच्या शहरांना वाचवू शकतो.

युनोचा अहवाल काय म्हणतो?
सागरी पातळीतील वाढ सुरू झाली आहे. मुंबई, न्यू यॉर्क, शांघायसारखी शहरे धोक्यात आली आहेत. समुद्रात भराव करू नये. किनारा संरक्षण समुद्री भिंत बांधण्याचा प्रस्ताव धोकादायक आहे.

अभ्यास करणाऱ्या विद्यापीठाचे म्हणणे काय?

  • मुंबई आणि चेन्नईसारखी शहरे २०३४ पासून तापमान वाढीमुळे ओस पडतील.
  • सागरी रस्त्यामुळे ही प्रक्रिया वेगाने आणि आधीच घडेल.
  • प्रदूषण निवारण करणारी मॅनग्रोव्ह वनस्पती नष्ट होईल.
  • दक्षिण ऑस्ट्रेलियात काही भागांत तापमान ५० अंशापर्यंत पोहोचत आहे. प्राणी, पक्षी, मासे इत्यादी जीव हजारो, लाखोंच्या संख्येत नष्ट होत आहेत.
  • औद्योगिकीकरणामुळे झालेल्या कार्बन उत्सर्जनामुळे सूर्याची उष्णता शोषली जाऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान, यंत्र येण्याच्या काळाच्या तुलनेत सुमारे १.५ अंश या धोक्याच्या पातळीवर गेले आहे.
  • महासागराचे पाणी व ध्रुव प्रदेशातील बर्फाची हजारो कोटी टन अधिकची वाफ दरवर्षी वातावरणात जात आहे. त्या वाफेचे पुन्हा पाणी वा बर्फ होऊन ती अवकाळी, अतिवृष्टी व हिमवृष्टीच्या रूपात कोसळत आहे.
  • वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे प्रशांत, हिंदी, अटलांटिक महासागरातील ३५ देश चिंतित आहेत. हे देश पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे बुडू लागले आहेत. पर्वतांवरील बर्फ वेगाने वितळते आहे.
  • शहराच्या भूभागाच्या पातळीच्या खालच्या बाजूला रस्ते बांधल्याने त्यांची उंची वाढविली जाते. याचा अत्यंत वाईट परिणाम होतो.
  • वाढलेल्या वाहनसंख्येमुळे नागरिकांना वाहतूककोंडी, ध्वनी-वायुप्रदूषण, आरोग्यावरील दुष्परिणाम, मानसिक तणाव इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले.

 

औद्योगिकीकरण व शहरीकरण विसर्जित करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू व्हायला हवी. पृथ्वी आपल्याला जगवते, अस्तित्व देते, औद्योगिकीकरण व अर्थव्यवस्था नाही. प्रचलित विकास पृथ्वीची जीवन क्षमता रोज नष्ट करत आहे. विकासाचे समर्थन हा मानवद्रोह व सृष्टिद्रोह आहे. - अ‍ॅड. गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

युनोचा सल्ला

  • सागरात भिंती बांधू नयेत; उलट त्यापासून दूर जावे.
  • भिंत बांधून सागराला अडविणे शक्य नाही.
  • सागरी रस्त्याचा भराव हा सागराची कोंडी करेल.

Web Title: ... Only cities like Mumbai can be saved !; Opinions of city practitioners, environmentalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.