फक्त जाहिरातबाजीवर देश चालणार नाही, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका
By admin | Published: July 25, 2016 08:13 AM2016-07-25T08:13:36+5:302016-07-25T08:16:06+5:30
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा चाले असे वागणारा राज्यकर्ता अजूनही या देशाला लाभला नाही हेच आता दुर्दैवाने बोलावे लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 25 - बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा चाले असे वागणारा राज्यकर्ता अजूनही या देशाला लाभला नाही हेच आता दुर्दैवाने बोलावे लागेल असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वारच प्रश्चचिनह उपस्थित केलं आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतातीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
उद्या शिवसेनेची एकहाती सत्ता येणारच आहे. भविष्यकाळ शिवसेनेचाच आहे. फक्त जाहिरातबाजीवर देश चालणार नाही. निवडणुका तर आम्ही आता लढणारच आहोत. बिहारात लढलो. उत्तर प्रदेश आणि गोव्यातही शिवसेना एका मजबुतीने उतरली आहे. अगदी ‘शतप्रतिशत’ वगैरे नाही, पण शिवसेना स्वबळावर प्रत्येक राज्यात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या राजकारणावर शिवसेनेच्या विचारांचा प्रभाव हा आहेच. त्याला एक राजकीय आकार देण्याचं काम सुरू झालं आहे असं सांगताना महाराष्ट्रातही स्वबळावर लढण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
दिल्लीशी संपर्क तुटला आहे व भाजपाशी सुसंवाद ठेवणारा कुणी नेता उरला नाही अशी खंत यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. काँग्रेसमुक्त देश करण्याचा मार्ग हा नाही. उत्तराखंड आणि अरुणाचलमध्ये राज्य आणण्याची घिसाडघाई करण्यापेक्षा पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात आणण्यासाठी शर्थ करा. देश तुम्हाला डोक्यावर घेईल! असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे.
मोदी सर्व काही नीट करतील, अशी आशाही उद्धव ठाकरेंना व्यक्त केली आहे. इतिहासातून राज्यकर्त्यांनी शिकायला हवे. इंदिरा गांधींचा पराभव झाला, पण जनता पक्षाचे नामोनिशाण मिटवून जनतेने पुन्हा इंदिरा गांधींना सत्तेवर का आणले? हे प्रत्येक राज्यकर्त्याने समजून घेतले पाहिजे असं सांगत भाजपाला सुनावलं आहे.
पाकिस्तानची मुजोरी वाढली आहे. ताज्या कश्मीर प्रकरणात ते पुन्हा दिसले. सत्तेवर येण्याआधी पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा आजच्या राज्यकर्त्यांनी केली होती. याचं कारण सगळ्यांना माहीत आहे. आपली काही संतवचने अशावेळी आठवतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा चाले असे वागणारा राज्यकर्ता अजूनही या देशाला लाभला नाही हेच आता दुर्दैवाने बोलावे लागेल असं बोलत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.