सीमा शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यानेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:07 AM2021-07-29T04:07:35+5:302021-07-29T04:07:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या सीमाशुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यानेच गोदामातील सोन्यावर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला ...

Only by the customs department staff | सीमा शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यानेच

सीमा शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यानेच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या सीमाशुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यानेच गोदामातील सोन्यावर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उदय सिंह गुर्जर असे आरोपीचे नाव असून, त्याने चोरलेल्या ९९५ ग्रॅम सोन्याचे बाजारमूल्य ३४ लाखांच्या घरात आहे.

१३ जानेवारी २०२० रोजी जेफरी होम्स हॅरिसन या अमेरिकन नागरिकाने भारतात येताना सोबत सोने आणले. सीमाशुल्क न भरल्याने त्याला हे सोने जमा करावे लागले. ते सीमाशुल्क विभागाच्या गोदामातील डिटेन्शन खोलीत ठेवण्यात आले. डिटेन्शन खोलीत ठेवलेल्या वस्तू संबंधित प्रवासी मायदेशी जाताना त्याला परत केल्या जातात.

सोने जमा करून वर्ष उलटले तरी हॅरिसन परत न आल्याने गुर्जरने त्यावर डल्ला मारण्याचे ठरवले. सीमाशुल्क विभागात निरीक्षक पदावर कार्यरत असल्याने त्याच्यासाठी हे काम सोपे होते. हॅरिसनसोबत आलेल्या अन्य दोन व्यक्तींचे सोनेही त्याच जागेवर ठेवण्यात आले होते. ते दोघे परतताना आपले सोने घेऊन गेले. त्यावेळेस गुर्जरने तीन व्यक्ती सोने घेऊन गेल्याची नोंद केली आणि ९९५ ग्रॅम सोन्याचे नाणे लांबवले.

३ जुलैला हॅरिसन आपले सोने परत घेण्यासाठी सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयात पोहोचला. मात्र, त्याला सोने देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्याने तक्रार दाखल केली. डिटेन्शन खोलीत वस्तू जमा केल्याची पावती हॅरिसनकडे असल्याने तपास अधिकाऱ्यांना संशय आला. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची तपासणी केली असता गुर्जरचा कारनामा उघड झाला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुर्जरकडील सोने ताब्यात घेऊन ते हॅरिसनला परत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Only by the customs department staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.