मुंबई : स्वप्न बघाल, ध्यास घ्याल तरच आयएएस, आयपीएससारख्या केंद्रीय सेवांमध्ये अधिकारी बनू शकाल. त्यासाठी खूप आधी तुम्हाला या सेवांमध्ये येण्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यादृष्टीने सातत्याने नियोजनपूर्वक तयारी करावी लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ आणि तरुण सनदी अधिकाºयांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या आयएएस, आयपीएस प्रशिक्षण शिबिरात तरुणांना स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक समजावून सांगितले.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. तर तरुण सनदी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ‘प्रशासकीय सेवेचे शिवधनुष्य पेलताना’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच वयाच्या २१ व्या वर्षी आयएएस अधिकारी बनलेले अन्सार शेख यांनी ‘आयएएस-२१’ हा विषय मांडला.
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अधिकारी बनणे हे खरोखरच आपले स्वप्न आहे की ते स्वप्न बाहेरून थोपविले आहे, याचे प्रामाणिक उत्तर स्वत:ला द्या. ते तुमचे स्वत:चे स्वप्न असेल तर मग थांबू नका. ज्या दिवशी तुम्ही अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहाल, ध्यास घ्याल त्या दिवशी तुमची अधिकारी बनण्याची प्रक्रिया सुरू होईल. मग, या प्रवासातील यशापयशातून शिकत पुढे जात राहा, असे पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना लोकसेवा परीक्षेचे स्वरूप समजावून घेणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम आणि आधीच्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न यांचा धांडोळा घेतला की आयोगाची आपल्याकडून नेमकी अपेक्षा काय आहे, याचा उलगडा होईल, असे अन्सार शेख यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यूपीएससीची तयारी करताना विचारपूर्वक नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्याची सवय लावून घ्यायला हवी. दिशाहीन तयारी करू नका. योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन घेत रहा, त्यासाठी स्वत: प्रयत्न करा. ही केवळ परीक्षा नाही एक प्रक्रिया आहे. आव्हानांचे संधीत रूपांतर करत, त्यातून शिकत पुढे जात राहिले पाहिजे, असे अन्सार शेख म्हणाले. वयाच्या २१व्या वर्षी आयएएस झाल्याचे आज कौतुक होते, पण त्यासाठी अडीच वर्षे दिवसाचे दहा-बारा कधी कधी चौदा तास अभ्यास केला, हे नजरेआड करून चालणार नाही, असेही ते म्हणाले.
या वेळी परिमंडळ-४ च्या पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना महत्त्वाच्या टिप्सही त्यांनी दिल्या. तर, सहभागी दहा विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ पद्धतीने पुस्तक, पेन आणि भेटवस्तू लालबागचा राजाच्या वतीने देण्यात आल्या. मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी प्रास्ताविक प्रशिक्षण शिबिराचे उद्दिष्ट सांगितले. तर अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.