मुंबईतील धरणाचे केवळ स्वप्नच
By admin | Published: November 5, 2014 03:57 AM2014-11-05T03:57:41+5:302014-11-05T03:57:41+5:30
पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगबरोबरच पश्चिम उपनगरांत दहिसर नदीवर धरण बांधण्याची तयारी पालिकेने सुरू केली
मुंबई : पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगबरोबरच पश्चिम उपनगरांत दहिसर नदीवर धरण बांधण्याची तयारी पालिकेने सुरू केली होती़ परंतु या धरणामुळे पाणीप्रश्न मिटण्याऐवजी त्या परिसरात पूर येण्याची धोक्याची घंटा सल्लागाराने वाजवली आहे़ त्यामुळे मुंबईतील पहिल्या धरणाचा प्रस्ताव गुंडाळण्याची वेळ पालिकेवर आली आहे़
पाणीपुरवठ्यापेक्षा मागणीच जास्त असल्याने ही तफावत भरून काढण्यासाठी जलस्त्रोत विकसित करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला़ गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचा ट्रेण्ड बदलल्यामुळे दरवर्षी पाण्याचे टेन्शन वाढते़ त्यामुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची तयारी सुरू झाली़ दहिसर व मागठाणे येथील रहिवाशांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी धरण बांधण्याचा निर्णय झाला़ बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या दहिसर नदीवर धरण बांधण्यात येणार होते़ त्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी सल्लागारही नेमण्यात आला़ मात्र मुसळधार पाऊस झाल्यास धरणाचे दरवाजे उघडावे लागतील़ त्यामुळे स्थानिक परिसर त्या पाण्याखाली बुडण्याचा धोका या सल्लागाराने वर्तविला़ परिणामी हा प्रस्तावच रद्द करण्यात येत असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)